सोलापूर :  गेल्या चार दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. अगदी तळकोकणापासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. सोलापूर जिल्ह्याला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. काढणीला आलेल्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर पावसामुळं झालेल्या दुर्घटनांमध्ये काही जणांना जीव देखील गमावावा लागला आहे.  नदी, नाल्यांना पूर आल्याने काही ठिकाणी लोक वाहून देखील गेले असल्याच्या घटना घडल्या आहेत.


पंढरपुरात भिंत कोसळून सहा मृत्यूमुखी
काल दुपारी चंद्रभागा तीरावर असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. रात्रभर मुसळधार पावसाने कुंभार घाटावरील नवीन घाटाचे बांधकाम कोसळल्याने ही दुर्घटना घडली. अग्निशमन दल व आपत्कालीन यंत्रणेने हे सर्व सहा मृतदेह दगड ढिगाऱ्याखालून बाजूला काढले आहेत. ठेकेदारावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका तेथील कोळी समाजाने घेतली होती.


लोक वाहून गेल्याच्या घटना
पावसामुळं अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे.  सावळेश्वर, ता. मोहोळ येथील शंकर देवकर यांच्यासह 4 जण पाण्यात वाहून गेल्याची माहिती आहे. रात्री उशीरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. तर बार्शी तालुक्यातील मुंगशी येथील एक वृद्ध व्यक्ती नागझरी नदीत वाहून गेले आहेत. परिते, ता. माढा येथील एक व्यक्ती पाण्यात वाहून गेली असल्याची माहिती आहे. तर निमगाव, ता.माढा येथे एक कार वाहून गेली ज्यात तीन व्यक्ती होते, अशी माहिती आहे.


राज्यात सलग चौथ्या दिवशी पावसाचा कहर! ग्रामीण भागासह शहरांनाही फटका; पुढील तीन दिवस असेच राहणार : IMD


बार्शी तालुक्याला सर्वाधिक फटका
जिल्ह्यातील 183 गावांना पावसाचा मोठा तडाखा बसल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती आहे. एकट्या बार्शी तालुक्यातील 137 गावांना फटका बसला आहे.  अतिवृष्टीमुळे कालपर्यंत 132 कुटुंबाना स्थलांतरीत केल्याची माहिती आहे. बार्शी शहरातील मुख्य बाजारपेठेत काल कमरेइतके पाणी साचले होते. त्यामुळं जनजीवन विस्कळित झाले आहे. तसंच झोपडपट्टी परिसरात अनेक घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.  बार्शी तालुक्यातील मालेगाव येथील एका 11 वर्षीय मुलाचा वीजेचा धक्का लागून मृ्त्यू झाला असल्याची माहिती आहे.



जिल्ह्यात काल दिवसभरात जवळपास 102 घरांमध्ये पाणी शिरुन नुकसान झाल्याची माहिती आहे. तर 169 घरांची पडझड देखील झाली आहे.  जिल्ह्यातील सुमारे 80 बंधारे, पाझर तलावांना पावसाचा तडाखा बसला असल्याची माहिती आहे.  दक्षिण सोलापुरातील हरणा नदीला मागील 30 वर्षांत पहिल्यांदाच पूर आला आहे, नदीकाठाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेततळ्यांना सांडवा नसल्याने शेततळ्यातील पाणी खाली करुन घेण्याची कृषी अधीक्षक कार्य़ालयाकडून सूचना देण्यात आली आहे.


पंढरपुरात चंद्रभागा नदीकिनारी कुंभार घाटाची भींत कोसळून 6 जणांचा मृत्यू


 जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. उत्तर सोलापुरातील मार्डी ते राळेरास मार्गावरील ओढ्याच्या पुलावरील पाणी असल्याने वाहतूक बंद होती.  उत्तर सोलापुरातील कवठे ते बेलाटी वाहतुक ओढ्याच्या पुलावरील पाण्यामुळे वाहतूक बंद होती. तर पावणी गावचा रेल्वे पुलाखालून जाणारा रस्ता बंद, तिऱ्हे मार्गे वाहतूक सुरु आहे.  बार्शी तालुक्यात वैराग-सोलापूर, वैराग-लाडोळे, बार्शी-कासारवाडी इत्यादी रस्ते पुर्ण बंद होते. तर बार्शी लातूर मार्ग देखील बराच काळ  बंद होता.  सांगोला तालुक्यात शेटफळ गौडवाडी ते बुद्धेहाळ ते कारंडेवाडी हे तीन रस्ते बंद तसेच घेरडी जवळील ओढ्याला प्रंचड पाणी असल्याने वाहतूक बंद केली होती. दक्षिण सोलापुरातील धोत्री ते सोलापूर, कासेगाव ते उळे, सिंदखेड ते मद्रे आणि होटगी ते होटगी स्टेशन हे रस्ते बंद होते.  अक्कलकोट तालुक्यातील अनेक वाहतुक मार्गांवर पाण्याचा अडथळा होता.



संबंधित बातम्या


Maharashtra Rain LIVE Update | राज्यभरात पावसाची कोसळधार! अनेक ठिकाणी घरांत पाणी शिरलं, तर अनेक भागांतील वीज गायब


Pune Rain : पुण्यात पावसाची उसंत, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान, नागरिकांनी रात्र काढली जागून


राज्यात सलग चौथ्या दिवशी पावसाचा कहर! ग्रामीण भागासह शहरांनाही फटका; पुढील तीन दिवस असेच राहणार : IMD


पंढरपुरात चंद्रभागा नदीकिनारी कुंभार घाटाची भींत कोसळून 6 जणांचा मृत्यू