पुणे : पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरश: धुमाकूळ घातला. अनेक रस्ते, नाले पाण्याखाली गेले आहेत. काल संध्याकाळपासून पावसाने झोडपून काढले आहे.  पुण्यामध्ये आता पाऊस थांबला आहे. काल कर्वेरोडवरचा नेहरु वस्तीमधील काही घरांमध्ये पाणी शिरलं होतं. आता वस्तीमधलं पाणी ओसरलं आहे. पण घरांमध्ये पाणी शिरल्याने खूप नुकसान झालं आहे. तसंच काही कोविड सेंटरमध्ये देखील पाणी शिरल्याने प्रशासनासह कोविड रुग्णांची देखील तारांबळ उडाली.


पुण्यातील सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. या रस्त्यावरून काही प्रमाणात वाहन वाहतूक करताना पाहायला मिळत आहेत. मात्र काही वाहन याठिकाणी बंद देखील पडली आहेत. काल रात्री काही वेळासाठी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. कालच पुण्यातील पावसाचा जोर काही वेळात कमी होईल असा अंदाज वेधशाळेने दिला होता.


पुण्यात मुसळधार पावसामुळं अनेक भागातील वीज गायब झाली होती. पाषाण, कर्वे नगर, बिबवेवाडी परिसरात अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. मुसळधार पावसाच्या अंदाजानुसार पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत गृह सर्वेक्षण स्थगित केले आहे.


Pune Heavy Rain | पुण्यात मुसळधार पाऊस, पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात


काल पुणे -सोलापुर हायवे पावसामुळे बंद झाला होता. उजनी धरणाचे पाणी भिगवण, डाळज, पळसदेव, इंदापूर येथे हायवेवर आल्याने पुण्यातुन सोलापुरकडे जाणारी वाहतुक लोणी काळभोर येथे थांबवली होती. कोणीही सोलापूर दिशेने प्रवास करू नये असे आवाहन करण्यात आले होते.


पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस कोसळला. मावळ तालुक्यात ही पाऊस बरसतोय. रात्रभर पावसाने जोर सुरूच ठेवला तर पवना धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळं पवना नदी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


पुण्यात जोरदार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.  आपण सुरक्षित ठिकाणी थांबा, घराबाहेर पडू नका! तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नागरिकांना केले होते.