सोलापूर : सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात उपनिरीक्षक असलेल्या राहुल बोराडे यांचा वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी निधन झालं. ते सोलापूर पोलीस आय़ुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात कार्य़रत होते. बोरोडे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. काही दिवस उपचार घेऊन बोराडे घरी देखील परतले होते. मात्र त्रास वाढल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जवळपास एक महिना त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार झाले. मात्र अखेर मंगळवारी त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झूंज संपली. 


पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून राहुल पोलीस दलात रुजू झाले. सुरुवातील पोलीस कॉन्स्टेबल म्हणून रुजू झालेल्या राहुल यांनी अधिकारी बनण्याच्या स्वप्नासाठी मेहनत घेणं थाबंवलं नाही. 2017 साली एमपीएससीच्या माध्यमातून ते पोलीस उपनिरीक्षक देखील झाले. ज्या पोलीस स्थानकात कॉन्स्टेबल म्हणून काम केलं त्याच पोलीस स्टेशनमध्ये फौजदार म्हणून रुजू झालेल्या राहूल यांचं सर्वत्र कौतुक देखील झालं. फौजदार होऊन राहूल बोरोडे यांनी आयुष्य कमावलं मात्र अल्पावधीतच कोरोनानं सारं काही हिरावून घेतलं. वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी राहुल यांचा दु्र्दैवी मृत्यू झाल्यानं सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


राहुल बोराडे यांना 3 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्याआधी त्यांचे आई-वडील तसेच अवघ्या सात वर्षांच्या मुलीला देखील कोरोनाची लागण झाली होती. काही दिवस उपचार घेऊन सर्व जण घऱी देखील परतले. मात्र राहुल यांना फुप्फुसाचा त्रास होत असल्याने पुन्हा एकदा सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात देखील त्यांना हलविण्यात आले. मात्र अखेर मंगळवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी तसेच अवघ्या चार वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची मुलगी असा परिवार आहे.


महत्वाच्या बातम्या :