सांगली : पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण अण्णा लाड यांनी आपल्या फंडातून सांगली जिल्ह्याला तीन व्हेंटिलेटरची मदत केली आहे. 25 लाख रुपये किंमतीचे तीन व्हेंटिलेटर सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात व्हेंटिलेटर सुपूर्द कार्यक्रम पार पडला. यावेळी युवा नेते प्रतीक जयंतराव पाटील, आमदार अरुणअण्णा लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड हे उपस्थित होते. 


कोरोना काळात नागरिकांचे होणारे हाल आणि ऑक्सिजनअभावी अनेकांनी प्राण गमावले. यासाठी आमदार लाड यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती ओळखून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे रुपये 25 लाख किंमतीचे तीन व्हेंटिलेटर सुपूर्द केले. तसंच त्यांनी सातारा,  कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्याला व्हेंटिलेटरसाठी एक कोटींचा निधी दिला आहे. त्यातीलच पहिल्या टप्प्यात हे सांगली जिल्ह्यासाठी व्हेंटिलेटर प्रदान करण्यात आले.


कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये प्रशासनालाही अनेक पातळ्यांवर अडचणीला सामोरं जावं लागलं. व्हेंटिलेटरची मोठी गरज भासत होती. कोरोना संसर्गाची दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सर्व साखर कारखानदार, राष्ट्रवादीच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना मदत करण्याचं आवाहन केलं होते. त्यानुसार पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांनी आपल्या फंडाच्या माध्यमातून तीन अत्याधुनिक व्हेंटिलेटर सांगली जिल्हा प्रशासनाला सुपूर्द केले. यामुळे रुग्णांचे जीव वाचवण्याचं काम होणार असून समाजातील इतर उद्योजकांनीही सरकारच्या नव्हे, तर समाजाच्या मदतीसाठी पुढे येणं गरजेचं असल्याचं मत अरुण लाड यांनी व्यक्त केलं. 


जगात आज कोरोनाची महामारी आहे, अनेक ठिकाणी प्रशासन सुद्धा मदत करण्यामध्ये तोकडं पडत आहे. रुग्णालयांमध्ये आजही व्हेंटिलेटरची गरज भासत आहे. हिच बाब लक्षात घेऊन आमदार अरुण लाड यांनी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यासाठी एक कोटींची व्हेंटिलेटर त्यांच्या निधीतून दिले आहेत. त्यातीलच पहिल्या टप्प्यात सांगली जिल्ह्यासाठी तीन व्हेंटिलेटर देण्यात आले.