सोलापूर : अवयवदानाबद्दल समाजात दिवसेंदिवस जनजागृती वाढताना दिसत आहे. उष्माघातानंतर ब्रेन डेड झालेल्या 14 वर्षीय मुलाच्या मृत्यूचं दुःख बाजुला ठेवून त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे. मुलाचा जीव वाचवु शकणार नसला, तरी त्याच्यामुळे इतरांना जीवदान मिळेल, या विचाराने मुलाच्या वडिलांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.


सोलापुरात 14 वर्षीय शिवपार्थ शिवशंकर कोळी या मुलाचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. आपला मुलगा ब्रेन डेड झाल्याचं कळताच शिवपार्थच्या वडिलांनी त्याचे अवयवदान करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला.

कुंभारी सोलापूरमधील अश्विनी रुग्णालयात शिवपार्थचे अवदान काढण्याची प्रक्रिया सुरु झाली. शिवपार्थचं हृदय पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमधील रुग्णाला दान करण्यात आलं. एअर अॅम्ब्युलन्सनं हृदय पाठवण्यात आलं.

शिवपार्थची एक किडनी सोलापूरच्या एका रुग्णाला देण्यात आली आहे, तर दुसरी किडनी आणि लिव्हर दीनानाथ हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी दान करण्यात आली आहे. त्यामुळे मुलाच्या निधनानंतरही चार जणांना जीवदान देऊन कोळी कुटुंबीयांनी एक आदर्श निर्माण केला आहे.