विधानपरिषदेचे सदस्य असलेल्या प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींविषयी अवमानकारक वक्तव्य केलं. यामुळे विधानपरिषद सभागृहाचाच एकप्रकारे अवमान झाला आहे. अशा सदस्यांना तात्काळ निलंबित करावं, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते, तर या आमदाराला फासावर द्या, असं म्हणाले असते, असं सांगत शिवसेनेच्या आमदार निलम गोऱ्हे यांनी प्रशांत परिचारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
काय आहे प्रकरण:
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसेमध्ये उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत विरोधकांवर टीका करण्याच्या नादात भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी सीमेवर लढणाऱ्या जवानांचा घोर अपमान केला होता.
"पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला. त्या आनंदात तो पेढे वाटतो.” असं वादग्रस्त वक्तव्य परिचारक यांनी केलं होतं.
सैनिकांबद्दल अपशब्द काढणाऱ्या आमदाराला ठोकणार : उदयनराजे
'आमदार असू दे नाहीतर कोणी, त्याला ठोकणार म्हणजे ठोकणार' अशा भाषेत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही परिचारक यांच्यावर सडकून टीका केली आहे.