सोलापूर :  सोलापूर शहर पोलिस आयुक्तलायतील सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले यांचे दुर्दैवी निधन झालं. ते 56 वर्षांचे होते. धक्कादायक बाब म्हणजे सकाळी जीममध्ये व्यायम करत असताना भोसले यांना अचानक चक्कर आली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी कळताच सोलापूर पोलिस दलातील अनेक अधिकारी, कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले. अचानक आपला सहकारी आपल्यातून निघून गेल्याने सोलापूर पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले हे आज सकाळी जिममध्ये व्यायाम करत होते. व्यायाम करत असताना त्यांना अचानकपणे चक्कर आली. यावेळी ते ट्रेडमिलवरच कोसळले. जिम ट्रेनरने तात्काळ त्यांच्या छातीला पंपिग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते शुद्धीत आले. थोडा वेळ आराम केल्यानंतर त्यांनी पुन्हा व्यायामाला सुरुवात केली. यावेळी त्यांना अचानक दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आला. तेव्हा जिममध्ये उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 


सुहास भोसले हे सोलापुर पोलिस आयुक्तलयात डिव्हिजन क्रमांक 1 चे सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बेंबळे या गावचे ते रहिवासी होते. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात सोलापुर जिल्ह्यातूनच झाली. त्यानंतर ते अमरावती येथे सेवेस होते. 1 एप्रिल 2019 रोजी ते सोलापूर पोलिस आयुक्तालयात सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून रुजू झाले होते. कालच सोलापुरातील जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली. या कामगिरीची माहिती देण्यासाठी एसीपी सुहास भोसले हे स्वत: हजर होते. आज अचानकपणे त्यांच्या मृत्यूची बातमी पोलिस दलात कळाल्यानंतर सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का बसला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.



  • व्यायाम करताना 'ही' काळजी घेणे आवश्यक


सुहास भोसले यांच्या मृत्यूनंतर जिम ट्रेनरकडून आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी जिम करताना काळजी घेणे आवश्यक असल्याची माहिती जिम ट्रेनर असलेल्या तनवीर शेख यांनी दिली. मर्यादेपेक्षा जास्त वेगाने धावल्याने देखील हृदयावर ताण येऊ शकतो. तसेच जिम करत असताना डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. अशावेळी जास्त प्रमाणात पाणी पिऊ नये. हळू-हळू पाणी प्यावे. तसेच रात्री योग्य झोप होणे देखील आवश्यक आहे. शरीराची मर्यादा ओळखून व्यायाम करावे. शरिरावर अतिरिक्त ताण देऊ नये. जिम करताना सावधानता बाळगणे गरजेचे असल्याची माहिती ट्रेनर तनवीर शेख यांनी दिली. 



  • पोलिसांच्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर होत आहेत परिणाम


सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे पोलिसांच्या जीवनशैलीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कामाच्या अनियमित वेळा, जेवण्याच्या अनियमित वेळ, अतिरिक्त ताण या सगळ्या कारणांमुळे पोलिसांच्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर परिणाम होतायत. जिथे सर्वसामान्य लोक 8 तासाची ड्यूटी करतात तिथे पोलिस कर्मचारी किमान 12 तासाची ड्यूटी करतात. कधी-कधी ड्यूटीचा वेळ 12 तासापेक्षा जास्त देखील असतो. विशेषत: रात्र पाळी काम करणाऱ्या पोलिसांना 12 तासाहून अधिक वेळ जागून ड्यूटी करण्याशिवाय पर्याय नसतो. तसेच कामाचा अतिरिक्त ताण देखील पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अधिक असतो. ड्यूटी संपल्यानंतर देखील सतत कामाचा विचार डोक्यात राहतो. यामुळे पोलिसांचे मानसिक स्वास्थ्य देखील बिघडते. शारिरिक स्वास्थ्य कायम ठेवण्यासाठी अनेक जण जिम करत असतात. मात्र मानसिक स्वास्थ्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. कामाच्या वेळांमुळे जेवण देखील वेळेवर करता येत नाही. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे.