मुंबई : घाटकोपरमधल्या अण्णाभाऊ साठे राहात असलेल्या चिराग नगरमधल्या घराला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी वास्तव्य असणाऱ्या घरात असलेल्या स्मारकाची पाहाणी केली. लवकरच चिराग नगरमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे मोठे स्मारक बांधण्यात येणार आहे. याचे काम लवकरच सुरु होणार असल्याचे जितेंद्र आव्हाड या वेळी म्हणाले.  कोरोनामुळे काही करता आले नाही. मात्र, आता कुठे तरी सुरुवात करावी म्हणून भेट दिल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. 


शिक्षण न घेता आंबेडकरांना गुरु मानत जागतिक दर्जाच्या साहित्याची निर्मिती त्यांनी केली. जातीयवादाच्या विषाविरोधात त्यांची प्रचंड आक्रमक भूमिका होती. त्यांचे एखादे स्मारक तयार व्हावे अशी घोषणा मी महाविकासआघाडी सरकार आल्यानंतर केली होती. मात्र, कोरोना आणि टाळेबंदीमुळे काही तेव्हा करता आले नाही. मात्र, कुठेतरी सुरुवात करावी म्हणून घराला भेट देत अभियंत्यांना काम सुरु करण्यास सांगितल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. 


अण्णाभाऊ साठे वास्तव्यास असलेल्या घराच्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक महाराष्ट्र शासनच्या गृहनिर्माण विभागामार्फत उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. घराच्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांचे पुनर्वसन मुंबईत प्रकल्पग्रस्त म्हणून शासनातर्फे इतरत्र करण्यात येणार आहे. 
अनिल देशमुखांच्या चौकशीसंदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता भाजप सीबीआयचा गैरवापर करत असल्याचं ते म्हणाले. सीबीआयला इतक्या खालच्या स्तरावर नेणं हे 70 वर्षात झालं नव्हतं. यंत्रणा एखाद्या संघटनेचं कार्यालयासारखं जर होणार असेल तर जनमानसाला समजत असतं काय सुरु आहे ते अशी प्रतिक्रया यावेळी आव्हाडांनी दिली. महाविकासआघाडीत कोणतेही मतभेद नसून प्रकल्प आणि विकासकामांना गती मिळावी यासाठी मुख्यमंत्री आणि पवारांमध्ये बैठक झाल्याचं त्यांनी सांगितलं.