मुंबई : पंढपूरची आषाढी यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली असताना वारकरी आणि राज्य सरकार यांच्यामध्ये पायी वारी नेण्यावरुन मतभेद आहेत. राज्य सरकारने मानाच्या दहा पालख्यांना एसटीबसने जाण्याची परवानगी दिली आहे. तर काही वारकरी अजूनही पायी पालखी नेण्यावर ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर पायी वारीच्या परवानगीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. संत नामदेव संस्थान नरसी नामदेव तर्फे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. 


सुप्रीम कोर्टाचे वकील ॲड. श्रेयश गच्चे आणि ॲड. राज पाटील कोर्टात बाजू मांडणार आहेत. किमान बसने जाणाऱ्या पालख्यांची संख्या तरी वाढवावी, अशी मागणी सुप्रीम कोर्टात येणार आहे. सरकार जे काही निर्देश देईल त्या सगळ्याचं पालन करायला वारकरी तयार आहेत. वारकरी हा शिस्तबद्धच असतो तो कधी धुडगुस घालत नाही. निवडणुकीसारखे अनेक राजकीय कार्यक्रम होतात मग वारीला अटकाव का? असा प्रश्ना आषाढी वारीसाठी पायी पालख्यांना परवानगी द्यावी याबाबत याचिका दाखल करणाऱ्या वकिलांनी उपस्थित केला आहे. अडीचशे नोंदणीकृत पालख्या असताना केवळ मानाच्या दहा पालख्या का निवडल्या. सर्वांच्या प्रतिनिधित्वाचा विचार का केला नाही. पहिली मागणी आमची पायी वारीला परवानगीची आहे, ती मान्य झाली नाही तर किमान बसने जाणाऱ्या पालख्यांची संख्या तरी वाढवावी ही विनंती कोर्टाकडे करू, असे ते म्हणाले. पुढच्या दोन-तीन दिवसात ही याचिका सुनावणीस येईल अशी आशा आहे, असे ते म्हणाले.


आधी शहरात लसीकरण करा मगच आषाढी वारी भरवा; पंढरपूर मधील नागरिकांची मागणी


यंदाही पालख्या बसमधूनच..
पंढरपूर येथे आषाढी एकादशीसाठी पायी वारीला मंजुरी न देण्यावर शासन ठाम आहे. आषाढीला पालख्या बसमधूनच येणार असल्याचं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. केवळ वाखरी ते पंढरपूर दीड किलोमीटर दिंडी पायी येणार असून एकादशी दिवशी शहरातील 195 महाराज मंडळींना देवाचे मुखदर्शन मिळणार आहे.


मानाच्या 10 पालखी सोहळ्यांच्या प्रस्थान सोहळ्याबाबत शासनाच्या आदेशात म्हटलं आहे की, देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 100 तर उर्वरित 8 सोहळ्यांसाठी 50 वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल. 


मानाचे पालखी सोहळे प्रस्थान ठिकाणाहून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तिथून पंढरपूरकडे दीड किमी अंतर प्रातिनिधीक स्वरुपात पायी वारी करण्यात परवानगी देण्यात आली आहे. 


यंदाच्या वर्षी सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होईल तप पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 


शेगाव दर्शन पॅटर्न पंढरपूर मंदिरात राबविण्यात यावा, विश्व वारकरी सेनेची मागणी


शासकीय महापूजा, विठ्ठलाशी संतांच्या भेटी गेल्यावर्षीप्रमाणेच करण्यात येणार आहे. तर नित्योपचार परंपरेनुसार सुरु ठेवून आषाढी यात्रा कालावधीत भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. 


एकादशी दिवशीचा रथोत्सवासाठी रथाऐवजी स्वतंत्र वाहनाने 10 मानकरी आणि मंदिर समितीचे 5 कर्मचारी असे 15 व्यक्ती येतील. यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाईल. 


संताच्या पादुका भेटीदरम्यान मानाच्या पालखी सोहळ्यातील 40 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. तर वारीसाठीच्या 2 बसमध्ये प्रत्येकी 20 असे 40 वारकऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.