करमाळा : करमाळा तालुक्यातील मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी ऊस बिल संदर्भात निवेदन देण्यासाठी गेलेल्या स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे याना शेतकऱ्यांसमोर मारहाणीचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून सडेतोड उत्तर दिलं जाईल, असं सांगितलं आहे. याप्रकरणी बोलताना स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांनी 'मी सोलापूर जिल्ह्यात जात आहे, त्या मस्ती चढलेल्या दिग्विजय बागलची जिरवायला जात आहे'. असा इशारा दिला आहे.

  


दिग्विजय बागल हे राष्ट्रवादीच्या माजी आमदार शामलताई बागल यांचे सुपुत्र असून सध्या बागल हे शिवसेनेत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार जिल्हाध्यक्ष सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवाध्यक्ष विजय रणदिवे व करमाळा तालुक्यातील कार्यकर्ते गेल्या वर्षीचे ऊसबिले पूर्ण न देता यावर्षी कारखाना सुरु कसे केले, बिले केव्हा देणार? असे विचारायला गेले होते. यावेळी चेअरमन दिग्विजय बागल यांनी रणदिवे व कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करुन मारहाणीचा प्रयत्न केला. स्वाभिमानीकडून हा आरोप करण्यात आला. ज्यानंतर आता  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हेही आक्रमक झाल्याचे दिसून आले.


'हात कलम करु'


या सर्व प्रकरणानंतर रविकांत तुपकर चांगलेच भडकले असून सोलापूर जिल्ह्यात जाऊन मस्ती चढलेल्या दिग्विजय बागलची जिरवणार असं सांगत शेतकऱ्यांवर हात उचलणाऱ्याचे हात कलम करू, असा इशारा यावेळी रविकांत यांनी दिला आहे. तसेच बागल यांच्या साखर कारखान्याला गाळप करण्याचा परवाना नाही, तरी बेकायदेशीर गाळप सुरू असा आरोपही तुपकरांनी यावेळी केला आहे.


महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha