सातारा : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी असून त्याच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काशीळ गावाजवळ हा भीषण अपघात झाला.


सौदागर कुटुंबिय पुणे-बंगळुरु महामार्गावरुन जात असताना चालकाचा गाडीवरुन ताबा सुटून हा अपघात झाला. अपघातानंतर गाडी झाडाला धडकल्याने गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला. बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काशीळ गावाजवळ गांधीनगर येथील ही घटना आहे.


यामध्ये सौदागर कुटुंबातील सात जणांना मृत्यू झाला. गाडीचा चालक गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला, अंदाजे साडेतीन वर्षाचा एक मुलगा आणि दोन मुलींचा समावेश आहे.


निजामुद्दीन सौदागर असं कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे नाव आहे. सौदागर कुटुंबिय कर्नाटक येथील धारवाडचे रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.