मुंबई :  ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील जेष्ठ नेते आणि माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यांच्यासोबत ठाणे मनपा प्रभाग क्रमांक सहा मधील सर्वच म्हणजे चारही माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीला सोडून शिंदे गटात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे. विशेष म्हणजे शिवाई नगरमधील दिवंगत माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी सुलोचना चव्हाण यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी ठाण्यातील लोकमान्यनगर येथे हणमंत जगदाळे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. आज संध्याकाळी सहा वाजता ठाण्यातील लक्ष्मी पार्क सर्व्हिस रोड येथील कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडला आहे.

  


राष्ट्रवादीला मोठा धक्का 


माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाण्यात राष्ट्रवादीला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. हणमंत जगदाळे हे  आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे त्यांचा शिंदे गटातील प्रवेश राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.  


46 वर्षांपासून शरद पवार यांच्यासोबत 


हणमंत जगदाळे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आहेत. ते ठाण्यातील अनुभवी आणि जुने नगरसेवक आहेत. शिवाय ते ठाणे महापालिकेत विरोधी पक्षनेते देखील होते. 1977 पासून म्हणजे गेल्या 46 वर्षांपासून ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत काम करत होते.  


 राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी केला शिंदे गटात प्रवेश


हणमंत जगदाळे, माजी जेष्ठ नगरसेवक आणि माजी विरोधी पक्षनेते 


राधाबाई जाधवर, माजी नगरसेविका, ठाणे 


दिगंबर ठाकूर, माजी नगरसेवक, ठाणे 


वनिता घोगरे, माजी नगरसेविका, ठाणे 


संभाजी पंडीत, माजी नगरसेवक 


संतोष पाटील,  माजी परिवहन समिती सदस्य