Chandrakant Patil Press Conferance : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर करण्यात आलेला हल्ला आणि महाराष्ट्रातील सरकारकडून भाजप (BJP) आणि केंद्रावर केली जाणारी टीका, या सगळ्या मुद्द्यांवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाष्य केलं. तसेच चंद्रकांत पाटलांचा मेंदू संग्रहालयात ठेवला पाहिजे, अशी टीका करणाऱ्या इम्तियाज जलील यांच्यावर चंद्रकांत पाटलांनी निशाणा साधला आहे. माझा मेंदू संग्रहालयात ठेवला पाहिजे, असं सांगितलं जातं आहे. काही हरकत नाही. मी साधा माणूस आहे, असं म्हणत त्यांनी जलीलांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. 


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, "आतापर्यंत राज्यात दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाले, त्यांना अटक झाली. संजय राठोड यांनीही राजीनामा दिला. या सगळ्यात कधीही किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला नाही. पण केंद्राची सुरक्षा असताना त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला." पुढे बोलताना ते म्हणाले की, "याचाच अर्थ असा की, अशा एका व्यक्तीवर आरोप झालेत. ज्याला ते सहन होत नाहीयेत. त्यामुळेच हा हल्ला झालाय. त्यानंतर रोज उठून त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. आम्ही वाघ आहोत, आम्ही सिंह आहोत, मुंबई आमची आहे.", असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. 


"सगळ्यांनी कोर्टाचा, पोलिसांचा सहारा घेतला, रस्त्यावर उतरुन आंदोलनाचा सहारा घेतला. पण हे पहिल्यांदा झालं की, झेड सिक्युरिटी असूनही किरीट सोमय्यांवर हल्ला झाला. यंत्रणाचा दुरुपयोग होतोय असं वाटत असेल तर कोर्टात जा. धमक्या का देत आहात? नागपूरला जाऊ देणार नाही ही काय भाषा आहे?", असा सवालही चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला आहे. "सीताराम कुंटे यांनी सरकारवर आरोप केले आहेत. परमबीर सिंह यांनी सरकारवर आरोप केले आहेत, आम्ही आरोप केले नाही. संजय राऊत म्हणत आहेत, की गुडघे टेकणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर पूर्वी गुडघे टेकले जायचे. पण आता यांची गुडघे टेकण्याची जागा बदलली आहे. आता सत्तेसाठी दुसऱ्यांसमोर गुडघे टेकले जात आहेत. मी सोमय्या यांच्या हल्या प्रकरणात अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे. सुट्टी असताना तिथं लोक कसे आले हा प्रश्न आहे." , असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 


चंद्रकांत पाटलांनी राज्यातील महापालिका निवडणुकांबाबतही भाष्य केलं आहे. सध्या यांना निवडणुकीसाठी वातावरण चांगलं नाही. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. नोव्हेंबरमध्ये निवडणूक घेण्यात यावी, अशी सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 




दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा