मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ( Sindhutai Sapkal passes away ) यांचे निधन झाले आहे.  वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला आहे. सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्रात हळहळ वयक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुताई सपकाळ यांना श्रध्दांजली वाहिली आहे. 


अनेक निराधारांच्या आयुष्यातील मायेची सावली हरपली - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त करत म्हणाले,"सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या समाजजीवनात आपल्या कामाने आदर्श निर्माण करणारी, अनेक निराधारांच्या आयुष्यातील मायेची सावली हरपली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली".


सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी - उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे समाजातील अनाथांच्या डोक्यावर मायेचे मातृछत्र धरणारी माय हरपली आहे. समाजातील हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करुन त्यांच्यावर मायेची पखरण करणाऱ्या सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. 


मातृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले - देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. 'राज्यातील अनेक अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने आज महाराष्ट्र खरोखरच एका ज्येष्ठ समाजसेविकेला मुकला आहे. त्यांच्या निधनाने मातृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे. ममता बालसदनच्या माध्यमातून त्यांनी अनेक अनाथांना आश्रय दिला. अनेक संस्था त्यांनी उभारल्या. मी मुख्यमंत्री असताना अनेकदा त्या भेटायला येत. या माध्यमातून त्यांच्या कार्याला हातभार लावता आला, याचे समाधान आहे. पण प्रत्येक वेळी ममतापूर्ण आणि अतिशय मायेने त्या विचारपूस करायच्या, हे अधिक स्मरणात आहे. त्यांच्या जाण्याने मनाला अतिशय वेदना होत आहेत. महाराष्ट्र आज एका मातेला मुकला आहे. त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. महाराष्ट्राच्या दुःखात मी सहभागी आहे', अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.


सिंधुताईंचे अकाली निधन चटका लावणारे - शरद पवार
शरद पवारांनीदेखील ट्वीट करत सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. अनाथ मुलांसाठी मायेची सावली धरणाऱ्या सिंधूताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!


गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली
निराधारांचा आधार आणि अनाथांची आई बनून समाजासाठी प्रेरणास्रोत ठरलेल्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे आकस्मिक निधन अतिशय दुःखदायक आहे. त्यांनी वात्सल्याची पाखर घालून मुख्य प्रवाहात आणलेल्या हजारो मुलांच्या आयुष्यातील प्रकाश बनून त्या नेहमी उजळत राहतील, अशा शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.


संबंधित बातम्या


अनाथांची माय सिंधुताई सपकाळ काळाच्या पडद्याआड, 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


Sindhutai Sapkal : एका युगाचा अंत! अनाथांसाठी आयुष्य झिजवणाऱ्या सिंधुताईंचा 750 हून अधिक पुरस्काराने सन्मान


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha