सिंधुदुर्ग : कोल्हापूरच्या गडहिंग्लजमधील शिक्षक विजयकुमार गुरव यांच्या मृत्यूचं गूढ उकललं आहे. विजयकुमार यांच्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीनं त्यांची हत्या केल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे.
हत्येप्रकरणी विजयकुमार यांची पत्नी जयलक्ष्मी गुरव आणि तिचा प्रियकर सुरेश चोथे या दोघांना मुंबईतील लोअर परळमधून अटक करण्यात आली आहे.
11 नोव्हेंबरला सिंधुदुर्गच्या आंबोली कावळेसाद येथं छिन्नविछीन्न अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता. त्याचवेळी गडहिंग्लज येथून आपले शिक्षक पती बेपत्ता झाल्याची तक्रार जयलक्ष्मी गुरव या महिलेनं दिली होती. विजयकुमार यांच्या हातातील दोऱ्यावरुन मृतदेहाची ओळख त्यांच्या मुलानं पटवली होती.
पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर अनैतिक संबंधातून पत्नीनचं ही हत्या केल्याचं समोर आलं. न्यायालयात हजर केल्यानंतर दोघांना आठ दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.