कोल्हापूर : त्यानं चार चाकी गाडीच स्वप्नं पाहिलं.. नशिबानं एका लकी ड्रॉद्वारे ते स्वप्न पूर्णही झालं. पण चारचाकी गाडी ताब्यात घेतली आणि हृदय विकाराच्या तीव्र धक्क्यानं त्याचा अंत झाला. नियतीनं हा क्रूर खेळ खेळला कोल्हापुरातील एका गरीब कुटुंबातील इसमासोबत.


खरं तर कोल्हापूरच्या वडणगे गावातील रहिवाशांनी, चंद्रकांत कांबळेंचं अभिनंदन करणारं बॅनर लावण्याची तयारी केली होती. मात्र नियतीला काही तरी वेगळंच मान्य होतं. अन् ग्रामस्थांना चंद्रकांत कांबळेंना श्रद्धांजली वाहणारं बॅनर लावावं लागलं.

या शोकांतिकेची सुरुवात एका सुखद बातमीनं झाली होती, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. ज्या घरात आज दुःखाचं सावट आहे, त्याच घरात दोन दिवसाआधी जल्लोष सुरु होता. कारण चंद्रकांत कांबळेंनी लॉटरीमध्ये कार जिंकली होती.



खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते चंद्रकांत कांबळेंना कारच्या चाव्या देण्यात आल्या. कार्यक्रम आटोपल्यानंतर चंद्रकांत कांबळे कुटुंबियांसह घराच्या दिशेनं रवाना झाले. मात्र घर गाठण्याआधीच चंद्रकांत कांबळेंना अस्वस्थ वाटू लागलं.

हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच चंद्रकांत कांबळेंनी अखेरचा श्वास घेतला. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. घरासमोर कार उभी राहणार म्हणून चंद्रकांत कांबळेंच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. मात्र त्या कारमधून प्रवास करण्याआधीच त्यांचा जीवनप्रवास संपला.