सिंधुदुर्ग: माझ्यावर हल्ला करणारे आणि जे षडयंत्र रचणारे होते त्यांना आज न्यायालयाने चपराक दिलेली आहे. जे गुन्हेगार आहेत त्यांना शासन झालंच पाहिजे असं शिवसेना कार्यकर्ते संतोष परब म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संतोष परब यांच्यावर राणे समर्थकांनी हल्ला केला होता. या प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर खटला सुरू आहे.
संतोष परब म्हणाले की, "या अगोदर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक गुन्हे घडलेले होते. मात्र त्याचा योग्य प्रकारे तपास झालेला नसेल किंवा दडपशाहीमुळे ती प्रकरणं समोर आलेली नव्हती. माझ्यावर झालेल्या हल्ल्यात ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्वांना शासन होईल. या हल्ल्याचा पोलिसांनी योग्य प्रकारे तपास केल्यामुळे त्याचं आभार मानतो. सुप्रीम कोर्टाने सुध्दा आज नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन रद्द केलेला आहे. ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांना लवकरच शासन होईल अशी आशा आहे."
कणकवलीचे माजी नगराध्यक्ष आणि नितेश राणेंचे कट्टर विरोधक संदेश पारकर म्हणाले की, "नितेश राणेंचा जिल्हा सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या तिन्ही न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे पोलिसांनी केलेला तपास योग्य होता हे स्पष्ट झालं आहे. नितेश राणे हेच संतोष परब हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधार होते, हे आता सिद्ध झालं आहे. त्यामुळे नितेश राणे यांनी आता पोलीस असतील किंवा कोर्टासमोर हजर व्हावं आणि पुढच्या कायदेशीर प्रक्रियेला सामोर जावं. कायदा सगळ्यांसाठी समान आहे. नितेश राणे यांना वाटत होतं की आपण आमदार आहोत, केंद्रीय मंत्र्याचे सुपुत्र आहोत, म्हणून आपल्याला वेगळा न्याय मिळेल. अशा पद्धतीने नितेश राणेंनी या जिल्ह्यामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. याला कोर्टाने चपराक दिली आहे. जो कोणी गुन्हेगार असेल त्याला शासन होईल हे आजच्या निकालावरून सिद्ध झालंय. त्यामुळे आता कुठेही न पळता नितेश राणेंनी कोर्टासमोर हजर व्हावं हीचं शिवसेनेची भूमिका आहे."
दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टात मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात 10 दिवसात शरण येण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या :