Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टात मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात 10 दिवसात शरण येण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. नितेश राणे यांना अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण मिळाले आहे. 


सुप्रीम कोर्टात आज नितेश राणे यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश रमण्णा, न्या. हिमा कोहली आणि न्या. ए.एस. बोपण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. नितेश राणे यांच्यावतीने अॅड. मुकुल रोहतोगी यांनी बाजू मांडली. नितेश राणे यांच्या विरोधातील कारवाई चुकीची आहे. नितेश राणे यांच्याविरोधातील कारवाई ही राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा अॅड. रोहतोगी यांनी केला. 
राज्य सरकारच्या बाजूने अॅड. अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली.  नितेश राणे यांच्याविरोधातील गुन्हे राजकीय नसून इतर गुन्हे दाखल आहेत. सध्या सुरू असलेल्या तपासात पैशांची देवाणघेवाण झाली का, कट आखला का आदींचा तपास होणे आवश्यक असल्याने अटकपूर्व जामीन फेटाळण्यात यावा असा युक्तिवाद अॅड. सिंघवी यांनी केला. 


नितेश राणे यांची याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाने त्यांना अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण दिले आहे. नितेश राणे यांनी 10 दिवसांत  सिंधुदुर्ग सत्र न्यायालयापुढे शरण जाण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले. नियमित जामीनासाठी राणे यांनी सत्र न्यायालयात अर्ज करावा असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले.


काय आहे प्रकरण?  


सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भावर्‍यात आडकले आहेत. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.