Nitesh Rane : शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांची आज पुन्हा कणकवली पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. नितेश राणे आज पुन्हा पोलीस ठाण्यात हजर झाले. अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टात दाखल केल्यानंतर नितेश राणे अज्ञातवासात होते. त्यानंतर आज त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपण पोलिसांना सहकार्य करत असल्याचे आमदार नितेश राणे यांनी म्हटले.
शिवसैनिक संतोष परब हल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांची मंगळवारी कणकवली पोलिस ठाण्यात चौकशी झाली होती. जवळपास ४० मिनिटांपेक्षा अधिक वेळ पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी त्यांची चौकशी केली. यावेळी आमदार राणे यांच्या सोबत त्यांचे वकील संग्राम देसाई उपस्थित होते.
नितेश राणे यांनी आज पुन्हा एकदा कणवकली पोलीस ठाण्यात हजेरी लावली. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नितेश राणे यांनी म्हटले की, सिंधुदुर्ग पोलिसांनी मला नोटीस बजावली होती. त्यानंतर मी पोलिसांसमोर हजर झालो आहे. मंगळवारीदेखील पोलिसांसमोर चौकशीसाठी उपस्थित होतो. त्यानंतर आज पुन्हा चौकशीसाठी हजर झालो आणि उद्यादेखील चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांना सहकार्य करणार असल्याचे आधीपासूनच आपण सांगत होतो. त्यानुसार सहकार्य करत असल्याचे राणे यांनी सांगितले.
नितेश राणे यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, हायकोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता. आता राणे यांनी अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली आहे.
काय आहे प्रकरण?
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भावर्यात आडकले आहेत. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.