सिंधुदुर्ग : मोठं होऊन तुला काय व्हायचं आहे, असं आताच्या मुलांना विचारलं तर ते काय सांगतील? डॉक्टर, इंजिनीअर किंवा पोलिस वगैरे उत्तर मुलं देतील. पण मला शेतकरी व्हायचंय, असं एखाद्या लहान मुलानं सांगितलेलं ऐकिवात आहे का?

मोठं झाल्यावर शेती करावी असं फारसं कुणाला वाटत नाही. पण सिंधुदुर्गातली एक मुलगी याला अपवाद आहे. मोठी होऊन ही मुलगी इंजिनीअर झाली खरी, पण ती रमली शेतीतच.

इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलेली सिंधुदुर्गातली रिना केसरकर शेतात राबते. आई आणि बहिणीसोबत रिना पेरणीची कामं करते. जोत धरणे, शेतीत चिखल करणे, अशी सगळी 'पुरुषी' समजली जाणारी शेतीची कामं रिना आवडीने करते.

इंजिनीअरिंग पूर्ण झाल्यानंतर नोकरी शोधण्यापेक्षा रिना शेतात रमली आहे. इंजिनीअर झालेली माणसं पुढे एमबीए वगैरे करण्याच्या विचारात असतात. पण रिनानं शेतीचाच ध्याय घेतला आणि रिनाच्या या ध्यासाला तिच्या घरच्यांनीही पाठिंबा दिला.

हल्लीची तरुण पिढी शेतीकडे फारशी फिरकत नाही, अशी ओरड अनेक जण करतात. मात्र याला रिना केसरकर ही एक खणखणीत उत्तर आहे.