सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उपस्थित असणार आहेत. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले उद्धव ठाकरे आणि नारायण राणे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.  


केंद्रीय मंत्री आणि शिवसेना यांच्यातील वैर तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर त्यांना थेट अटक करण्यात आली होती. त्यामुळे यांच्यातील वैर अधिकच वाढलं आहे. आता आज 20 वर्षांनंतर चिपी विमानतळाचे बांधकाम पूर्ण होऊन त्याचं लोकार्पण केलं जाणार आहे. या निमित्ताने मुख्ममंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच मंचावर येणार असल्याने ते  एकमेकांना भेटणार का, काय बोलणार यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर आज मिळणार आहेत.


अखेर कोकणी माणसांचं स्वप्न साकार होत आहे. चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ शनिवारपासून सुरू होत असून त्याची लँडिंग चाचणी पूर्ण झाली आहे. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता आज सिंधुदुर्ग विमानतळ उद्घाटन सोहळा मोजक्या हा निमंत्रितांच्या उपस्थितीत होत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रोटोकॉलप्रमाणे राज्य, केंद्राचे मंत्री, प्रमुख अधिकारी यांच्यासाहित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही प्रमुख मंडळी निमंत्रित असणार आहेत


तत्कालीन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू आणि सिंधुदुर्गचे तत्कालीन पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या प्रयत्नाने 2018 साली गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्ग विमानतळाच्या धावपट्टीवर गणेशाची मूर्ती घेऊन विमानाचे टेस्ट लँन्डिंग झाले होते. त्यानंतर सुरेश प्रभूही विमानाने त्या धावपट्टीवर उतरले होते. पण त्यावेळी सिंधुदुर्ग विमानतळाचे काम पूर्ण नसल्याने केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाकडून विमानतळास परवानगी मिळाली नव्हती. आता विमानतळाचे काम पूर्ण झाल्याने डिजीसीएकडून सर्व परवानग्या मिळाल्याने विमानतळ उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे. 


सिंधुदुर्ग विमानतळाच्या उद्घाटनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळाचं लक्ष सिंधुदुर्ग विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमावर असणार आहे. 


सिंधुदुर्ग विमानतळ कोणी सुरू केलं यावरून सिंधुदुर्गात मोठं राजकारणसुद्धा पहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हे विमानतळ मी बांधून पूर्ण केलं असं म्हणतात. तर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी हे विमानतळ आपल्या काळात पूर्ण झालं असून आपल्याच काळात सूरु होत आल्याचं म्हटलं आहे.


सिंधुदुर्ग विमानतळ उद्घाटन कार्यक्रमात अत्यंत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी माध्यमांवरही कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. 


संबंधित बातम्या :