Narayan Rane Exclusive : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्या उद्घाटन होतंय आणि या निमित्तानं एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकत्र येतायत. विमानतळावर सुरु असलेल्या पोस्टर वॉरमुळे या कार्यक्रमात काय होणार? याची झलक पाहायला मिळाली आहे. आता खुद्द नारायण राणे यांनीच उद्याच्या उद्घाटन कार्यक्रमात शिवसेनेच्या नेत्यांबद्दल मोठा गौप्यस्फोट करण्याचा इशारा देऊन वादाची नांदी दिलीय. शिवसेनेच्या हप्तेखोरांची नावं आपण उद्याच्या कार्यक्रमात जाहीर करू, असं सांगत राणेंनी वादाचे फटाके लावायला सुरुवात केली आहे.


केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, "सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ (Sindhudurg Chipi Airport) सुरु होणार याचा आनंद आहे. 1997-98 साली सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला. तेव्हापासून विमानतळ व्हावी, अशी माझी इच्छा होती, ती आज पूर्ण होत आहे. प्रफुल्ल पटेल यांनी ग्रीनफिल्ड विमानतळ आलं तेव्हा मंजुरी दिली होती. 15 ऑगस्ट 2009 साली या विमानतळाचा भूमिपूजन झालं. ज्यावेळी विमानतळाचं भूमिपूजन करत होतो, तेव्हा शिवसेना जमीन संपादित करू नका, विमानतळ आम्हाला नको म्हणून आंदोलन करत होती. विनायक राऊत त्यावेळी विमानतळाच्या विरोधात आंदोलन करत होते आणि आज श्रेय घ्यायला पुढे येत आहेत." 


यांना कोणी विचारत नव्हतं मी ज्योतिरादित्य शिंदेंकडे जाऊन सर्व परवानग्या घेतल्यात : नारायण राणे 


"2014 साली विमानतळ बांधून पूर्ण केलं. पण मधल्या काळात काहीही केलं नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं. त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. ज्यांनी विरोध केला तेच काही लोक आता श्रेय घेण्यासाठी पुढे आहेत. शिवसेना रोज तारखा जाहीर करत होती. पण यांना कोणी विचारत नव्हतं मी ज्योतिरादित्य शिंदेंकडे जाऊन सर्व परवानग्या घेतल्यात.", असा टोला नारायण राणेंनी शिवसेनेला लगावला आहे. 


कोकणात शिवसेनेची हप्तेबाजी सुरुये, हप्तेखोरांची नावं मी उद्याच्या सभेत जाहीर करणार : नारायण राणे 


नारायण राणे बोलताना म्हणाले की, "शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सिंधुदुर्गातील उद्योजकांना प्रचंड त्रास सुरु आहे. रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम करण्यासाठीसुद्धा अडवणूक करण्यात आली. शिवसैनिकांनी अधिक गाड्या घेतल्या आणि मगच रस्त्याचे काम सुरु करु दिलं." पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले की, "कोकणात शिवसेनेची हप्तेबाजी सुरु आहे. या हप्तेखोरांची नावं मी उद्याच्या सभेत जाहीर करणार आहे. कोकणाच्या विकासाला आड येणाऱ्या लोकांचा भांडाफोड मी उद्याच्या सभेत करणार आहे."


उद्या सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच मंचावर येणार आहेत. याबाबत बोलताना नारायण राणे म्हणाले की, "16 वर्षानंतर मी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समोरासमोर भेटणार आहोत. राज्याचे मुख्यमंत्री उद्घाटनाला येत आहेत. याचा आनंद आहे, मी त्यांचे स्वागत करणार आहे."


अजित पवारांशी संबंधित साखर कारखान्यांचे संचालक आणि अजित पवारांच्या नातेवाईकांच्या घरी आयकर विभागाच्या धाड सत्रांबाबत बोलताना नारायण राणे म्हणाले की, "मी याबद्दल काहीही बोलणार नाही. सध्या आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. कारवाई सुरु असताना बोलणं योग्य नाही." तसेच पुढे बोलताना त्यांनी राज्य सरकारला आवाहनही केलंय. ते म्हणाले की, "मी माझ्या विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त उद्योग महाराष्ट्रात आणणार आहे. राज्य सरकारनं आम्हाला तसं सहकार्य करावं."