सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती निवडीला नाराजीचे पडसाद सत्तारूढ भाजप पक्षात उमटलेले पहायला मिळाले. काल सभापती निवडीत मूळ भाजपचे जिल्हा परिषद सदस्य इच्छुक होते. मात्र भाजपच्या मूळ सदस्यांना डावलून राणे समर्थकांना पुन्हा संधी दिल्याने जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली. त्यामुळे भाजप पक्षाची ही नाराजी पक्षश्रेष्ठी समोर डोकेदुखी ठरत आहे.


जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी सत्ताधारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवार निवड करताना भविष्यात होवू घातलेल्या व राजकीय प्रतिष्ठेची असलेल्या जिल्हा बॅंक निवडणुकीचा विचार करून संधी दिली. मात्र यामुळे मूळ भाजपच्या काही सदस्यांत तीव्र नाराजी पसरली आहे. यातील उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी उपाध्यक्ष पदासह सदस्यपदाचा तर संजय देसाई यांनी सदस्यपदाचा तडकाफडकी राजीनामा देवून ही नाराजी जाहीर व्यक्त केली. यानिमित्ताने भाजप मधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली असून लॉरेन्स मान्येकर यांच्या समर्थकांनीही पक्षाच्या पदांचा राजीनामा देण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे जिल्हा बॅंक पूर्वतयारी भाजपला बूमरॅंग होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 


भाजपची सत्ता जिल्हा परिषदेवर आहे. भाजपकडे 31 संख्याबळ आहे. अध्यक्ष निवडीवेळी विरोधी शिवसेनेने सत्तांतर करण्याचा प्रयत्न केला. त्यात ते अपयशी ठरले. सभापती निवडीवेळी शिवसेनेने अर्जच दाखल केले नाहीत. शिवसेना अर्ज दाखल करेल या शक्‍यतेने भाजपने सर्व तालुक्‍यांना न्याय देत लॉरेन्स मान्येकर यांना उमेदवारी जवळपास निश्‍चित केली होती. परंतु शिवसेना उमेदवारी दाखल करीत नसल्याचे लक्षात येताच अंतिम क्षणी भाजपने जिल्हा बॅंकेचा विचार करीत जिल्हा बॅंक उपाध्यक्ष व सहकार क्षेत्रात चांगले स्थान असलेल्या राष्ट्रवादीचे दोडामार्ग सुरेश दळवी यांच्या सुनेला डॉ. अनिशा दळवी यांना संधी दिली.


जिल्हा परिषदेएवढीच जिल्हा बॅंकेची सत्ता महत्वाची असल्याने भविष्याचा वेध घेवून भाजपने हा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय मूळ भाजपच्या सदस्यांना पचनी पडला नाही. जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हापसेकर, सदस्य संजय देसाई यांनी तडकाफडकी थेट उपाध्यक्ष पदासहीत जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. म्हापसेकर यांचा निर्णय भाजपच्या जिव्हारी लागणारा तसेच मूळ भाजपच्या गोटाला हलविणारा आहे. म्हापसेकर यांनी राजिनामा दिला आहे. याशिवाय दोन जिल्हा परिषद सदस्यांच्या स्वाक्षरीने राजीनामा दिला आहे. नियमात एकदा राजीनामा दिला तर तो मंजूर होतो. परंतु अध्यक्षा संजना सावंत यांनी सावध भूमिका घेत आपल्याकडे राजीनामे आलेले नाहीत, असे स्पष्ट केले आहे.