रत्नागिरी : अजय देवगणचा 'तान्हाजी-अनसंग वॉरिअर' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरत आहे. चित्रपटाची तरुणाईमध्ये कमालीची क्रेज दिसत आहे. चित्रपट अधिकाधिक लोकांनी पाहावा आणि तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा कहाणी सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथील श्री भगवती ट्रॅव्हल्सचे मालक संतोष धुरत यांनी अनोखा उपक्रम सुरु केला आहे..
तान्हाजी हा चित्रपट पाहिल्याचं सिनेमाचं तिकीट दाखवा आणि राजापूर कोंड्ये ते मुंबई खासगी आराम बसचं एक तिकीट मोफत मिळवा, अशी ऑफर आपल्या ग्राहकांना भगवती ट्रॅव्हल्सने दिली आहे. त्याला चांगलाच प्रतिसादही मिळत आहे. 21 जानेवारी 2020 पर्यंत ही ऑफर सुरु राहणार आहे.
संतोष धुरत कायमच सामाजिक कामात अग्रेसर असतात. कोंड्ये गावात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. आपला व्यवसाय संभाळून ते असे उपक्रम राबवतात.अजय देवगणचा तान्हाजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर तो हिट ठरत आहे. आता धुरत यांनी आपल्या प्रवाशांना तान्हाजी हा चित्रपट पाहिला असल्याचे तिकीट दाखवा आणि राजापूर कोंड्ये ते मुंबई खासगी आराम बसचं एक तिकीट मोफत मिळवा अशी वेगळी ऑफर दिली आहे. यातून या चित्रपटाची प्रसिद्धी करण्याबरोबरच आपल्या ग्राहकांना काहीतरी वेगळा अनुभव त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. जास्तीतजास्त ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घ्यावा असं, आव्हान धुरत यांनी केलं आहे.
दोन दिवसात 35 कोटींहून अधिक कमाई
तान्हाजी सिनेमाने पहिल्याच दिवशी तब्बल 15.10 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी तान्हाजीच्या कमाईत पहिल्या दिवशीच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली असून या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 20.57 कोटी रुपये कमावले आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 35 कोटींचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट एकूण 4540 स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे 2020 ची सुरुवात 100 कोटीच्या सिनेमाने होते का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Movie Review | कसा आहे 'तान्हाजी- द अनसंग वॉरिअर'