Nagpur News : न्युमोकोकल आजारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पीसीव्ही (PCV) लसीचा शहरातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये तुटवडा निर्माण झाला आहे. यासंदर्भातील माहिती एका व्हिडीओ क्लिपच्या निमित्ताने व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे या लसी खासगी रुग्णालयांत मुबलक प्रमाणावर उपलब्ध आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या रुग्णालयांबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात बाळांना लस देण्यासाठी पालकांची पायपीट होताना दिसत आहे.


लस उपलब्ध नसल्याचे कारण देत पालकांना परतवून लावले जात आहे. खासगी रुग्णालयात लस सहज उपलब्ध असून त्यासाठी 4 ते 5 हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे पालकांमध्ये संताप आहे. क्लिप व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने लस मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पुण्याहून खेप मिळावी आणि ती तत्काळ शहरात पोहोचावी, यासाठी हालचाली केल्या जात असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.


हिवाळ्याचे दिवस असल्याने न्युमोकोकल आजारांचा धोकाही अधिक आहे. यामुळे बालकांना पीसीव्ही लसीचा डोस देण्याचा आग्रह डॉक्टरांकडून धरला जात आहे. लस मिळावी यासाठी पालकांची वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये पायपीट सुरू आहे. पण, लस मिळतच नसल्याने संताप व्यक्त होतो आहे. शासकीय रुग्णालयात तुटवडा असलेली ही लस खासगी रुग्णालयांमध्ये सहज उपलब्ध आहे. पण, त्यासाठी 4 ते 5 हजार रुपये आकारले जात असल्याचे बाळाला घेऊन शहरभरातील शासकीय रुग्णालयात चकरा घातलेल्या पालकाने सांगितले. मुळातच महाग असलेली ही लस आरोग्य विभागाकडून आरोग्य संचालक कार्यालयाला उपलब्ध करून दिली जाते. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य विभागाला गरजेनुसार साठा उपलब्ध करून दिला जातो. पण, पुण्याहून लसींची खेपच मिळत नसल्याने शहरात तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या देशभरातच या लसीचा तुटवडा असल्याचे सांगितले जाते. अनेक दिवसांपासून असाच प्रकार सुरू आहे. पण, या प्रकाराला वाचा फुटताच प्रशासनात खळबळ उडाली आहे. 


पुण्याला पाठवले जाणार वाहन!


न्युमोकोकल कन्ज्युगेट वॅक्सिन (पीसीव्ही) पुणे कार्यालयातून प्राप्त होते. शहरातील रुग्णालयात लसीचा तुटवडा असल्याने मनपाच्या (Nagpur Municipal Corporation) आरोग्य विभागावर खापर फोडले जात आहे. पालकांचा दबाव वाढत असल्याने मनपाच्या आरोग्य विभागाने आरोग्य उपसंचालक कार्यालयाने पुण्यातील कार्यालयाकडे लस मिळण्यासाठी तगादा लावला आहे. तत्काळ लस नागपुरात (Nagpur) पोहोचावी यासाठी अधिकारी स्तरावरून चर्चा झाली आहे. आता पुण्याला आपले वाहन पाठवून तातडीने लसीची खेप मागविण्याची तयारी करण्यात आल्याचे समजते.


विभाग म्हणे, देशभरात तुटवडा...


वैद्यकीय उपसंचालक कार्यालयामार्फत लसीचा पुरवठा प्रथम महापालिकेच्या आरोग्य विभागाला केला जातो. तिथून गरजेनुसार शासकीय रुग्णलयांमध्ये लस उपलब्ध करुन दिली जाते. मनपातील आरोग्य विभागाकडे विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, नागपूर शहराची वार्षिक गरज 40 ते 45 हजार लसींचाच पुरवठा झाला आहे. पुरेसा साठा मिळत नसल्याने मेडिकल, मेयो, डागा यांसह शहरातील सर्वच शासकीय रुग्णालयात तुटवडा आहे.


ही बातमी देखील वाचा


Measles Disease : लसीकरण करा अन्यथा गोवर गंभीर होऊ शकतो! कोणत्या वयोगटात अधिक लागण? काय सांगताहेत तज्ञ