मुंबई : ज्या शेतकर्‍यांनी शेतीपंपाचे चालू बिल भरले आहे अशा शेतकर्‍यांच्या वीजजोडण्या कापू नयेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अधिकार्‍यांना दिले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी चालू बिल भरलेल्या शेतकऱ्यांचे विज जोडणी कापल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना याबाबतचे निर्देश दिले आहेत. 


वीज बिल न भरल्याने वसुली सुरु असते. परंतु, अतिवृष्टीमुळे यंदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांचं नुकसान झाल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना सूट द्यावी असे आदेश दिले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 


देवेंद्र फडणवीस म्हणाले, "ज्यांकडे नुकसान नाही त्यांनी नियमित वीज भरणा करावा. नुकसानग्रस्त भागात भविष्यात वसुली करता येईल. परंतु, शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचे कनेक्शन तोडू नका असे आदेश दिले आहेत.   


यंदा प्रथम अतिवृष्टी आणि नंतर परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशातच आता शेतीपंपांची बिले थकल्याने वीज वितरण कंपन्यांनी शेतीपंपांची कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर महावितरणने बिल वसुलीसाठी रोहित्र बंद करण्याचा, छोट्या डीपी काढण्याचा धडाका लावला आहे. किमान थकलेली दोन बिले तरी शेतकऱ्यांनी भरावीत असे आवाहन महावितरण करत आहे.


वीज वितरण कंपन्यांच्या कनेक्शन तोडणी मोहिमेमुळे विहिरीत पाणी असून देखील शेतीला पाणी देता येत नाही. त्यामुळे पिकं सुकून जात आहेत. आधी अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन तोडणी मोहिमेमुळे दुहेरी फटका बसत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालू बिल भरलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचे कनेक्शन तोडू नका असे आदेश दिले आहेत.  


शेतकऱ्यांमध्ये संताप 
थकलेली वीज बिले वसूल करण्यासाठी वीज कंपन्यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यात वीजपूरवठा खंडीत केला जात आहे. यामध्ये लातूर, बीडसह उस्मानाबाद जिल्ह्यातील 18 हजार कृषिपंपांची वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यात देखील शेती पंपांचे कनेक्शन तोडण्याची मोहीम राबवली जात आहे. वीज कंपन्यांच्या या मोहिमेविरोधात शेतकरी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.  


महत्वाच्या बातम्या


शेतकऱ्यांना आता वसुलीचा शॉक! लातूर, बीडसह उस्मानाबाद जिल्ह्यातील 18 हजार कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडीत