Pune News: दर महिन्याला रेशन दुकानात 20 तारखेनंतरच धान्य मिळते. आता रेशनवर धान्य आले पण मशीन खराब आहे. मशिनवर अंगठा लावला तरी त्याची नोंदणी होत नाही. अशा तक्रारी रेशन कार्ड धारकांकडून केल्या जात आहेत. अनेक रेशन कार्ड धारकांच्या अशाच तक्रारी आहेत. ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने चार दिवसांपासून धान्य वितरणसुद्धा ठप्प आहे. याचा फटका गरीब नागरिकांना बसत आहे.
राज्यातील रेशन दुकाने ई-पॉस मशीनवर रेशन कार्ड धारकांची बायोमेट्रिक नोंदणी करून धान्य वितरण करतात. परंतु नुकतंच ई-पॉस मशीनवर नवीन सॉफ्टवेअर अपलोड करण्यात आले आहे. पुरवठा विभागाच्या वितरणातील त्रुटींमुळे ऑगस्टमध्ये रेशन दुकानांवर धान्य उशिराने उपलब्ध झाले. पुन्हा ई-पॉस मशीनवरील सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली. बायोमेट्रिक नोंदणी मशीनवर केली जाते. मात्र धान्य दिल्याची पोचपावती नाही. अशा परिस्थितीत रेशन दुकानदारांसमोर दुसरा पर्याय उरलेला नाही. त्यामुळे पुणे शहर, जिल्हा आणि इतर अनेक शहरांमध्ये धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
पुणे विभागातील रेशन दुकाने आयएसओ प्रमाणित आहेत. सर्व्हर डाऊन आणि सॉफ्टवेअरमध्ये बिघाड होतच राहतो. याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांच्याकडून नीट उत्तरे मिळत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रकरण निकाली काढावे, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेने केली आहे.
यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधण्यात आला. तांत्रिक समस्या दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ई-पॉस मशीनसाठी नवीन सॉफ्टवेअर देण्यात आले आहे. नवीन सर्व्हरवर अपलोडिंगचं काम सुरु असल्यामुळे ही समस्या होत आहे. लवकरच ही समस्या दूर होईल, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
धान्य वितरण चार दिवसांपासून ठप्प
ई-पॉस मशिनच्या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याने रेशनवरील धान्य वितरण चार दिवसांपासून ठप्प आहे. कोणीही अधिकारी जबाबदारी घेण्यास तयार नाही. प्रशासकीय यंत्रणेत अशी परिस्थिती आहे, अशी माहिती पुणे शहर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी यांनी दिली.