Gadchiroli News गडचिरोली : 1 मे रोजी सर्वत्र महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) उत्साहात साजरा केला जात असताना, त्याच पुरोगामी महाराष्ट्रात हृदय पिळवून टाकणारी घटना घडली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli News) एटापल्ली तालुक्याच्या बार्सेवाडा येथे जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना काही गावकऱ्यांनी मिळून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जमनी तेलामी (53), देऊ आतलामी (60) अशी मृतांची नावे असून याप्रकरणी 15 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, हे प्रकरण दुसऱ्या दिवशी उजेडात आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 


जादूटोणाच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले


या घटनेत महाराष्ट्र दिन 1 मे रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास गावकऱ्यांनी एकत्र येत दोघांना अतिशय निर्दयीपणे मारहाण केली. त्यानंतर मरणासन्न अस्वथेत असलेल्या दोघांना ओढत नेत रात्री 10 वाजताच्या दरम्यान गावाबाहेरील नाल्यात पेटवून दिले. दुसऱ्या दिवशी उशीरापर्यंत याविषयी कुणालाच माहिती नव्हती. दरम्यान, पोलिसांना या प्रकरणाची कुणकुण लागताच त्यांनी तपासाची चक्रे फिरवून परिसरात विचारपूस सुरू केली. तपासादरम्यान गुन्ह्याचा उलगडा झाला आणि घटनास्थळी दोघांच्या मृतादेहांचा कोळसा झालेले आढळून आले.


त्यानंतर पोलिसांनी रितसर कारवाई करत आतापर्यंत  याप्रकरणी गावातील एकूण 15 जणांना अटक केली असून या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींमध्ये मृत जमनी हीचा नवरा देवाजी तेलामी (60) आणि मुलगा दिवाकर तेलामी (28) यांचा देखील समावेश आहे.


तलवारीच्या धाकावर 30 शेळ्या टेम्पोमध्ये नेल्या चोरून


तलवारीच्या धाकावर काही आज्ञातांच्या टोळीने 30 शेळ्या टेम्पोमध्ये टाकून चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना यवतमाळच्या महागांव तालुक्यातील गुंज येथील हिवरदरी रस्त्यावरील गोठ्यात घडली आहे. रात्रीच्या सुमारास काही अज्ञात दरोडेखोरांनी किसन पवार शेतातील गोठ्यातून शेतकऱ्याचे हात पाय बांधून आणि गळ्यावर तलवार ठेवून 30 शेळ्या चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकराला विरोध करत असताना चार ते पाच चोरट्यांनी शेतकरी संतोष पवार यांना मारहाण देखील केलीय. या घटनेमुळे परिसरात आणि तालुक्यात एकच दहशत निर्माण झाली आहे.


चोरी गेलेल्या शेळ्यांची किंमत अंदाजे 3 लाख 50 हजार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तालुक्यातील ही गंभीर घटना असून चोरून नेलेल्या शेळ्यांचा टॅम्पो माहूर अथवा आर्णी मार्गे गेल्याचे संतोष पवार यांच्याकडून पोलिसांना सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच महागाव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास सध्या पोलीस करीत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या