मावळ, पुणे : मावळ लोकसभेत महायुती मोठी खदखद असल्याची चर्चा नेहमीचं होते. अशातच दिल्लीचं एक पथक मतदारसंघात आलं, अशी प्रेस नोट महायुतीच्या श्रीरंग बारणेंच्या टीमने काढली. मात्र दिल्लीचं कोणतं ही पथक मावळात आलंच नसल्याचा दावा भाजपने केला आहे. त्यामुळं बारणेंकडून अशी प्रेस नोट नेमकी का आणि कशासाठी काढली गेली होती? यातून बारणेंना नेमकं काय साधायचं होतं? असा प्रश्न मतदारसंघात उपस्थित होत आहे. दिल्लीचं पथक आलं आणि गेलं या चर्चेने महायुतीत संभ्रम वाढल्याचं पाहायला मिळत आहे. 


श्रीरंग बारणेंचा  प्रचार नेमका कसा सुरु आहे, हे प्रत्यक्षात पाहण्यासाठी दिल्लीचं एक पथक मावळ लोकसभेत आलं आहे. याबवत प्रसारमाध्यमांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे बारणेंच्याच टीमने कळवलं होतं. मात्र मला याबाबतची कल्पना नाही, ते पथक माझ्यापर्यंत आलं नाही, असं म्हणत बारणेंनी आता सावध भूमिका घेतली होती. त्यानंतर आता भाजपनेदेखील अशा कोणत्या प्रकारचं पथक आलं नसल्याचं सांगितलं आहे. कोणत्याही प्रकारचं भाजपचं किंवा केंद्राचं पथक किंवा नेते येणार असले तर शहराच्या पक्षाच्या अध्यक्षाला कळवलं जातं मात्र आमच्याकडे अशी कोणतीही माहिती आली नसल्याचं भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगतापांनी सांगितलं आहे. 


महायुतीत खदखद?


मागील काही दिवसांपासून महायुतीत खदखद असल्याची चर्चा रंगली होती. मात्र अशी कोणतीही खदखद नसून सगळे एकत्र काम करत आहोत, असं जगतापांनी सांगितलं आहे. सुरुवातीला जेव्हा महायुती झाली तेव्हा काही जणांमध्ये खदखद होती. मात्र त्यानंतर सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायचं ठरवलं. आता सगळे मिळून प्रचार करत आहोत. उमेदवाराला जिंकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहे. बारणे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असंही ते म्हणाले. 


मावळमध्ये बारणे विरुद्ध वाघेरे लढत


मावळमध्ये बारणे विरुद्ध वाघेरे अशी लढत आहे. बारणेंना विजयी करण्यासाठी मोठ्या नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहेत. तर वाघेरेंना विजयी करण्यासाठीदेखील वरिष्ठांच्या सभा आणि रोड शो आयोजित केले जात आहे. मावळमध्ये शिवसेना विरुद्ध उबाठा अशी लढत असल्यामुळे अनेकांचं या मतदारसंघाकडे लक्ष लागलं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


lok sabha election Votting : वासुदेव आला रे, वासुदेव आला...; पिंपरी चिंचवडमध्ये वासुदेव करतायत मतदानासाठी जनजागृती


Rahul Gandhi : राहुल गांधींच्या अमेठी लढतीवर जवळपास शिक्कामोर्तब; हायहोल्टेज लढत पुन्हा रंगणार