नागपूर : आतापर्यंत विविध पेमेंट गेटवेच्या नावाखाली आर्थिक गुन्हे घडवणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी आता समाजात वाढलेल्या आंबटशौकिनांना टार्गेट केलं आहे. त्यासाठी डेटिंग साईट्स आणि काही तरुणींचा वापर करत आंबट शौकिनांना त्यांना व्हिडीओ कॉल करायला उद्युक्त केलं जात आहे. व्हिडीओ कॉलवर केलेले अश्लील चाळे रेकॉर्ड करून ते वायरल करण्याची धमकी देऊन हजारो, लाखो खंडणी स्वरूपात उकळली जात आहे. धक्कादायक म्हणजे या नव्या डिजिटल ब्लॅकमेलिंग मध्ये अडकणारे समाजातील कथित सुशिक्षित वर्गातलेच जास्त आहेत.


'आपके पास सिर्फ 15 मिनिट का समय है, उसके बाद आपका व्हिडीओ युट्युब पर अपलोड कर दूंगी, आपकी पुरी फ्रेंड लिस्ट मेरे पास है, जितना लेट रिप्लाय दोगे उतना ये विडिओ वायरल होगा, बोलो हाँ, या ना, विडिओ डिलीट करवाने के लिए पैसे दो, आपके पास सिर्फ १५ मिनिट है, उसके बाद आपके दोस्तों के पास आपका विडिओ होगा, मै एक एडल्ट चैनल के लिए काम करती हूँ, 15 हजार दो, जल्दी बोलो क्या करना है', ऐकून जरा विचित्रं वाटलं ना?


नागपुर सह प्रत्येक शहरात अनेक डॉक्टर्स, वकील, इतर प्रोफेशनल्स, श्रीमंत व्यापारी यांना आलेले हे मेसेज आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ज्यांना हे मेसेज येत आहेत, त्यांनी नेमकं केलं काय, तर या लोकांनी इंटरनेटवर विविध डेटिंग साईट्सला भेटी दिल्या; तिथल्या तरुणींच्या जाळ्यात अडकले आणि नंतर तरुणींच्या आग्रहास्तव त्यांना व्हिडीओ कॉल केले.


तरुणींनी सुरुवातीला व्हिडीओ कॉलवर प्रेमाने गप्पा मारल्या आणि एक दोन व्हिडीओ कॉल नंतर या आंबट शौकिनांना त्यांच्या आवडीप्रमाणे उद्युक्त करत व्हिडीओ कॉल वर अश्लील चाळे करायला लावले. व्हिडीओ कॉलवर पलीकडून तरुणींच्या प्रोत्साहनामुळे कोणी आपले कपडे काढले, तर कोणी त्याच्या पुढच्या मर्यादा ही ओलांडल्या आणि मग सुरु झाला खरा खेळ.


या खेळात व्हिडीओ कॉल संपण्याच्या काही मिनिटानंतर त्या तरुणीचा मेसेज येतो आणि त्यात व्हडिओ कॉल वर केलेले अश्लील चाळे रिकॉर्ड झाले असून ते सर्व फेसबुकसह सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल करण्याची धमकी सुरु होते. समोरच्या व्यक्तीची ऐपत पाहून त्याला 15 हजार ते 50 हजारपर्यंतची खंडणी मागितली जाते.


अश्लील व्हिडीओ कुटुंबापर्यंत, बायको पर्यंत, सर्व मित्रांपर्यंत पोहोचवण्याची धमकी दिली जाते. धक्कादायक म्हणजे डेटिंग साइट्सच्या नावावर चालणाऱ्या या खंडणी- वसुलीच्या जाळ्यात अडकणारे समाजातील पांढरपेशे वर्गातले असतात.यातून बहुतांशी लोकं पैसे देऊन सुटका करू पाहतात. मात्र, एकदा पैसे दिल्यानंतर आणखी मागणी सुरु होते आणि अखेरीस सुटका करून घेण्यासाठी तक्रार पोलिसांकडे पोहोचते.


नागपूरात अशाच घटनांची संख्या जास्त


नागपूर पोलिसांकडे गेल्या काही दिवसात अशा आशयाच्या 20 पेक्षा जास्त तक्रारी आल्या. त्यापैकी अनेक लोकं तर फसवणूक झाल्यानंतर बदनामीच्या भीतीने आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे पोलिसांना आधी त्यांची समजूत काढत तुम्हाला आम्ही या चक्रव्यूहातून बाहेर काढू असे आश्वासन देत शांत करावे लागले. सध्या पोलिसांनी सर्व प्रकरणात गुन्हे दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला आहे. मात्र, हे सर्व सायबर गुन्हेगार आणि त्यांच्या सोबतच्या तरुणी कुठे तरी लांब बसून हे खेळ खेळत असल्याने अद्याप कोणीही पोलिसांच्या हाती लागलेलं नाही. दरम्यान, लोकांनी डेटिंग साईट्सचा मोह मात्र सोडला आहे.


फसवणूक कशी टाळली जाणार?


अनोळखी लोकांचे फोन, मेसेज टाळले तर ९९ टक्के त्यांची फसवणूक होण्याचं कारण नाही असे पोलिसांचं म्हणणं आहे. ऑनलाईन पद्धतीने होणारे आर्थिक गुन्हे सतत घडत असताना आता लॉकडाउनच्या काळात त्याचे प्रमाण वाढलेलं होतं. शिवाय लॉकडाउनच्या काळात रिकामे बसलेल्या आंबटशौकिनांनी डेटिंग साइट्सकडे मोर्चा वाळवल्यामुळे सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीची हा नवीन युक्ती शोधून लाखो रुपये उकळण्याचं सत्र सुरु केलं होतं. ज्याबाबतच धक्कादायक खुलासा आता झाला आहे.