मुंबई : शिवसेना गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. गोव्यामध्ये काँग्रेससोबत निवडणूक लढवण्याचा आमचा विचार आहे, मात्र, त्यांच्या नेत्यांची इच्छा असेल तर ते शक्य होईल असेही ते म्हणाले. वेळेनुसार निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाने पुर्ण तयारी करून हा निर्णय घेतलेला आहे. निवडणुका घेणं गरजेच आहे. जाहीर सभांवर बंदी घातली आहे, ती बंधनं सर्वांसाठी समान असावीत असेही राऊत यावेळी म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या लाटेचा कहर असताना सर्वच पक्षांनी कशाप्रकारे तिथे प्रचारसभा घेतल्या विशेष करून पंतप्रधानांनी कशाप्रकारे मोठ्या सभा घेतल्या. पंजाबमध्ये जे घडलं त्याच्यानंतर आम्हाला पंतप्रधान मोदी यांची चिंता वाटत असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. गोव्यात आणि उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका लढण्याचा विचार आहे आणि त्यानुसार आमची तयारी सुरू आहे. आमचे पोस्टर, ॲडव्हर्टायझिंग दिसत नसतील पण आमचे विचार मजबूत असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.
गोव्यामध्ये युती व्हावी असा आमचा विचार आहे. काँग्रेसने आमच्यासोबत राहावं म्हणून मी स्वत: बोलणी केली आहेत. काँग्रेसला जर स्वबळावर सत्ता मिळेल, असे वाटत असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत असे राऊत म्हणाले. पण आम्ही काही दिवस प्रयत्न सुरू ठेवू असेही राऊत यावेळी म्हणाले. काही ठिकाणी टप्प्यांमध्ये निवडणुका आणि काही ठिकाणी एकाच टप्प्यात निवडणुका ही राजकीय पक्षांची सोय पाहिली जात आहे. आम्ही पश्चिम बंगालमध्येसुद्धा हेच पाहिलं. काही पक्षांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून, या केलेल्या तडजोडी असाव्यात, असे राऊत यावेळी म्हणाले.
प्रमोद सावंत हे मनोहर पर्रिकरांपेक्षा मोठे नाहीत
प्रमोद सावंत यांना जर स्वबळावर सत्ता येईल असा आत्मविश्वास असेल, तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांपेक्षा प्रमोद सावंत मोठे नाहीत. कारण पर्रिकर होते तेव्हा 13 जागा आल्या होत्या असा टोला राऊत यांनी लगावला. दुसऱ्यांचे पक्ष फोडून भाजपने लोक घेतले असल्याचे राऊत यावेळी म्हणालेत. कधीकाळी गोव्यामध्ये भाजपचा सरपंच काय पंचही नव्हता, पण केलं ना. सरपंच असण्याचा आणि नसण्याचा काही फरक पडत नाही. आम्ही विधानसभा जिंकू मग सरपंच आपोआप येतील असे राऊत यावेळी म्हणाले. मतांची विभागणी व्हावी म्हणून भाजपने विरोधी पक्षांच्या काही लोकांना हाताशी धरले का? अशी शंका मला येत आहे. गोव्याच्या लोकांमध्ये संताप आहेत. अति आत्मविश्वास म्हणजे भारतीय जनता पार्टीला मोकळं रान देण्यासारखा आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.