मुंबई: राज्याचे राज्यपाल आणि सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होत आहे, शिवरायांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलं जात आहे, सीमाभागातील गावांवर कर्नाटकडून दावा केला जात आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसत असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. त्याविरोधात आता येत्या 17 तारखेला जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Winter Session 2022) आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये मोर्चाचा हा निर्णय घेण्यात आला. 


उद्धव ठाकरे म्हणाले की, "राज्यात अस्तित्वात आलेल्या बेकायदेशीर सरकारमुळे राज्याची अस्मिता धुळीस मिसळत आहे. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडे जात आहेत. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गावांवर दावा केला आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान धुळीस मिळत आहे. गुजरातची निवडणूक जिंकावी म्हणून महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवली. पुढच्या वर्षी कर्नाटकची निवडणूक असल्याने राज्यातील उद्योग आता कर्नाटकला जाणार का? या सगळ्यावरून राज्यात मुख्यमंत्री आहेत का असा प्रश्न पडतोय."


येत्या 17 तारखेला अतीभव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्राचा अपमान होत असल्याने आता महाराष्ट्राच्या शक्तीचं विराट दर्शन दाखवलं पाहिजे. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा विरोट मोर्चा काढण्यात येणार असून त्यामध्ये सर्वांनी सामिल व्हावं. हा केवळ राजकीय विषय नाही, तर राज्याच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. 


मोर्चा तर होणारच, अजित पवारांचा निर्धार 


राज्यपालांना हटवलं तरी हा मोर्चा होणारच असा निर्धार राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. हा विषय केवळ राज्यपालांच्या वक्तव्याचा नाही तर राज्यात आता नवीन सरकार आल्यापासून सीमाभागातील गावांकडून दुसऱ्या राज्यात जाण्याची मागणी केली जात आहे, हे या आधी कधीही घडलं नव्हतं असं अजित पवार म्हणाले. राज्यातील मोठमोठे उद्योग हे गुजरातला जात आहेत, हे या सरकारचं अपयश आहे. आम्ही नवीन उद्योग आणू असं म्हणणाऱ्यांनी जे आहेत ते थांबवावेत असा टोलाही त्यांनी लगावला. 


कर्नाटकच्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळी वक्तव्यं सुरू ठेवली आहेत. बेळगावात जाण्यापासून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी रोखल्यानंतर राज्यातील मंत्र्यांनी माघार घेतली, त्यांच्याकडून लंगडं समर्थन केलं जात असून उभा महाराष्ट्र हे पाहतोय असं अजित पवार म्हणाले.