मुंबई : राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेने रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. रामनाथ कोविंद हे भाजप प्रणित एनडीएकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची 'मातोश्री'वर बैठक घेऊन यासंदर्भात चर्चा केली आणि त्यानंतर रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला. रामनाथ कोविंद हे बिहारचे विद्यामान राज्यपाल आहेत.
रामनाथ कोविंद यांच्या नावाला शिवसेना पाठिंबा देणार की नाही, याबाबत कालपासून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. अखेर कोविंद यांच्या नावाला पाठिंबा देऊन शिवसेनेने या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
हिंदूराष्ट्रासाठी मोहन भागवत हे आम्हाला राष्ट्रपती म्हणून हवे होते आणि भागवत राष्ट्रपती व्हावेत, असे अजूनही आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही या भूमिकेवरुन यूटर्न घेतला नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
भाजपला प्रत्येकवेळी विरोध करावा, अशी आमची भूमिका नाही. मात्र, जिथे पटणार नाही, तिथे आम्ही विरोध करणारच, असेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
रामनाथ गोविंद यांच्याविषयी 10 खास गोष्टी :
1. सध्या बिहारचे राज्यपाल
2. भाजपमध्ये दलित समाजचं प्रतिनिधित्व करणारं मोठं नाव
3. दोन वेळेस राज्यसभेचे खासदार
4. उत्तरप्रदेशच्या कानपूरचे रहिवाशी
5. भाजपच्या दलित मोर्च्याचे अध्यक्षही होते.
6. ऑल इंडिया कोली समाजाचे अध्यक्ष होते.
7. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ताही होते.
8. पेशानं वकिल
9. 2002 मध्ये संयुक्त राष्ट्रात भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.
10. गृह मंत्रालयासह अनेक मंत्रालयाचे सदस्य होते.