मुंबई : दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशातील काही घोळ असतील तर ते बुधवारपर्यंत दूर करण्यात येतील आणि गुरुवारपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरळीत होईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासंबंधीचा घोळ मिटवण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विनोद तावडे बोलत होते. एक दिवस उशिर होईल पण 22 जुनपासून अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरळीत होईल असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी व्यक्त केला आहे.
दहावीच्या निकालानंतर सर्व विभागात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावतीमध्ये ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे. मुंबईतही पार्ट 1 मध्ये 30 हजार विद्यार्थ्यांचं फॉर्म भरण राहिलं असेल किंवा डिप्लोमाकडे ते गेले असतील. तसंच पार्ट 2 चा 67,289 विद्यार्थ्यानी फॉर्म भरला आहे. मात्र नंतरच्या काळात सर्व्हर स्लो झाल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे अधिकचे 3 सर्व्हर वाढवलेत आणि बँडविड्थ वाढवण्याची सूचना दिली आहे, अशी माहिती विनोद तावडेंनी दिली आहे.
सर्व्हर स्लो झाल्यामुळे अनेकांना ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणी येत होत्या. उद्या एक दिवस पूर्ण घेऊन सर्व प्रकारच्या सुधारणा करण्यास दिला आहे आणि टेक्निकल एक्सपर्ट घेऊन मी स्वतः तपासणी करणार असंही विनोद तावडे म्हणाले.
ज्यांनी अर्ज भरला आहे त्यांना पुन्हा भरण्याची गरज नाही. कला आणि स्पोर्ट्स विषयातही पुर्नमुल्यांकनाची सुविधा मिळणार आहे, फेरतपासणीसाठी अर्जही करता येणार आहे. तसंच ज्या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी विषय अवघड जातात, त्यांना गणिताशिवाय करिअर करता येऊ शकतं. तज्ञांशी चर्चा करुन योग्य प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचंही तावडेंनी स्पष्ट केलं आहे. अतिरिक्त गुणांसाठी विद्यार्थी पुन्हा वेबसाइटवर अप्लाय करु शकतील असंही तावडेंनी म्हटलं आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, त्यामुळे उद्या बुधवारचा एक दिवस आम्ही सर्व तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी घेणार आहोत, आणि गुरुवारपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती तावडेंनी दिली. एक दिवस उशीर होईल पण प्रवेश प्रक्रिया बिनचूक होईल असंही तावडेंनी स्पष्ट केलं आहे.