मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामिनाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणी केवळ 10 मिनिटात निकाल देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला असून या प्रकरणाची सुनावणी उद्या घेण्यात येणार आहे. दरम्यान संजय राऊत यांच्या जामिनाची याचिका आर्थर रोड तुरुंगात पोहोचल्याने संजय राऊत राऊत यांची आज सुटका होणार हे नक्की झालं आहे. 


पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांना आज विशेष सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात ईडीने उच्च न्यायालयात धाव घेत स्थगिती देण्याची मागणी केली होती. यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने या प्रकरणात 10 मिनिटात निर्णय देता येणार नाही असं सांगितलं आणि राऊतांच्या जामिनाला स्थगिती देण्यास नकार दिला. तुम्ही गुणवत्तेच्या आधारावर युक्तिवाद करा, तो पटला तर आम्ही आरोपींना पुन्हा तब्यात घेण्याचे निर्देश देऊ असं न्यायालयानं म्हटलं आहे. 


आजच सुटका 


संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची बेल कॉपी आर्थर रोड तुरुंगाच्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांची आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुटका होईल अशी माहिती आहे. 


दोन लाखांच्या कॅश बॉंडवर संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची सुटका करण्यात येणार आहे. संजय राऊत हे मागील 100 दिवसांपासून तुरुंगात आहेत. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. 


संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष सुरू केला आहे. संजय राऊत यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. 


खासदार संजय राऊत यांची सुटका झाल्यानंतर ते पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट देऊन दर्शन घेणार आहेत अशी माहिती आहे. 


कोर्टाने ईडीला झापलं 


संजय राऊत यांच्या जामीन प्रकरणावर सुनावणी घेताना न्यायालयाने ईडीला झापलं आहे. कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे की, पत्राचाळ प्रकरणी दोन्ही आरोपींना बेकायदेशीररीत्या अटक करण्यात आली आहे. दिवाणी खटले हे मनी लॉन्डरिंग किंवा आर्थिक गुन्हे अशा नावाखाली आणून निर्दोष लोकांना त्यात ओढून त्यांना अटक करून अशा परिस्थितीत आणणं हे न्यायालय मान्य करू शकत नाही. प्रवीण राऊत यांना फक्त दिवाणी खटल्यात अटक करण्यात आली तर संजय राऊत यांना काहीही कारण नसताना अटक केली गेली. या प्रकरणात राकेश आणि सारंग वाधवान मुख्य आरोपी असताना त्यांना अटक कऱण्याऐवजी संजय राऊत आणि प्रविण राऊत यांना अटक कऱण्यात आली. यात ईडीच्या बाजूने आरोपी पिक अँड चूज केल्याचं दिसतंय. जर कोर्टाने इ़डी आणि म्हाडाचं म्हणणं मान्य केलं तर मर्जीने आरोपी निवडण्याच्या पद्धतीला मान्यता दिल्यासारखं होईल. सामान्य लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल.