Sanjay Raut Bail : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना तब्बल 100 दिवसांनी पत्राचाळ प्रकरणात विशेष पीएमएलए न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामिन मिळाल्याचे जाहीर होताच कोर्टापासून ते पार राज्याच्या कानाकोपऱ्यात जल्लोष सुरु झाला आहे. टायगर इज बॅक, शिवसेनेचा ढाण्या वाघ बाहेर येणार अशाच प्रतिक्रिया उमटत आहेत. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर कोल्हापूरमध्येही जल्लोष करण्यात आला.


शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी यांनी शिवसेनेचा ढाण्या वाघ बाहेर आल्याची प्रतिक्रिया दिली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिकांनी सुडाचे राजकारण सुरु  असल्याचा आरोप केला. विजय देवणे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सावध रहावे, सुषमा अंधारे यांनी तुम्हाला सळो की पळो करून सोडलं आहे, आता वाघ तुम्हाला सोडणार नाही. मुरलीधर जाधव यांनी जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला. त्यांचं आता 120 चा वेग लागेल असेही त्यांनी नमूद केले. 


संजय पवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, संजय राऊत यांच्या हेतूपरस्पर कारवाई करण्यात आली. जे देशभरात घडत आहे ते महाराष्ट्रात घडत आहे. आमच्याविरोधात बोलायचं नाही, तो नियम कुठून काढला आहे? हा हुकूमशाहीला धक्का आहे. न्यायदेवतेनं आम्हाला न्याय दिला आहे. 


कोर्टात काय-काय झालं? 


मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयानं दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती देशपांडे यांच्यासमोर पार पडली. मात्र कोर्टाच्या निर्णयावर ईडीच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला आहे. तसेच, या जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. हे छोटंमोठं प्रकरण नाही, मोठी नावं यात सहभागी आहेत. त्यामुळे या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायलाच हवी अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली आहे. या आठवड्याचे केवळ दोन कामकाजाचे दिवस बाकी आहे. त्यामुळे किमान या आठवड्याभराची स्थगिती द्यावी. जेणेकरून आम्ही या निकालाचा अभ्यासकरून येत्या आठवड्यात हायकोर्टात दाद मागू शकू, असा युक्तिवाद ईडीच्यावतीनं करण्यात आला आहे. दरम्यान, जामीनाबाबत आज दुपारी 3 वाजता न्यायालय निकाल देणार आहे. 



पत्रचाळ प्रकरण काय?


मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले. 



इतर महत्वाच्या बातम्या