Shivsena Name and Formation Story : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळं राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे.शिंदेंचा गट आता सत्ता स्थापनेच्या दिशेनं कूच करतोय का? असाही प्रश्न निर्माण होतो, कारण लवकरच ते त्यांच्या गटाचं नाव अधिकृतरित्या जाहीर करण्याची शक्यता आहे. सरकार तयार करण्यासाठी त्यांना संघटनात्मक बांधणीची गरज असणार आहे आणि त्यासाठी शिंदेंच्या गटाचं नाव शिवसेना(बाळासाहेब ठाकरे) असं ठरल्याची चर्चा आहे. आता शिवसेनेनं सुद्धा या नावावर आक्षेप घेत विरोध दर्शवलाय.
शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर केल्यास शिवसेना कायद्याची लढाई लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.मात्र शिवसेना पक्षाचं मूळ नाव कसं ठरलं याची कहाणी सुद्धा चांगलीच रंजक आहे.
1960 चं दशक होतं, मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहीकाच्या संपादकांनी म्हणजेच बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मराठी माणसाच्या हितासाठी काहीतरी नवीन करण्याचा निर्धार केला.मात्र हा प्रयोग नसून भक्कम काही तरी असावं हे त्यांचं मत होतं. संबंधित विचाराबाबत मार्मिकच्या कचेरीत खलबतं सुरु झाली आणि संघटना स्थापन करण्याचा निर्णय झाला.
संघटनेची संकल्पना:
बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे थोर समाजसेवक होते आणि त्यांची ख्याती राज्यभर होती. अगदी शाहू महाराजांपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत सर्वांशीच त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात त्यांचा वाटा हा अमूल्य होता, तर त्यांचं दादर येथील घर संयुक्त महाराष्ट्र चळवलीचं केंद्रस्थान होतं.दादरला घर असल्याने अनेक बैठका त्यांच्याच घरी पार पडायच्या.मुंबईत प्रवास करण्याच्या दृष्टीनं दादर खुप सोयीचं ठरतं. प्रबोधनकारांनांही समाजसेवेचा वारसा होता आणि त्यामुळं आपल्या मुलाच्या या कल्पनेला त्यांनी त्वरित हिरवा कंदील दिला.
आता विषय येऊन थांबला तो संघटनेच्या नावावर. बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे, मीनाताई ठाकरे, मार्मिकमधील इतर सहकारी अशा सर्वांनीच विचारमंथन केलं मात्र नाव काही कुणाला सुचेना . कुणाला सुचलंच तर इतरांचा त्या नावाला नकार असायचा. अशात एकेदिवशी प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना संघटनेबाबत विचारणा केली असता बाळासाहेबांनी नावाचा पेच अजूनही सुटला नाही हे सांगितलं. प्रबोधनकार ठाकरे पटकन म्हणाले, विचार काय करायचा? शिवाजी महाराजांची ही सेना आहे, संघटनेचं नाव " शिवसेना" आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या या संघटनेला नाव मिळालं.
शिवसेना आणि अत्रे कनेक्शन:
शिवसेना या शब्दच प्रयोग पहिल्यांदा झाला तो संयुक्त महाराष्ट्र चळवळीत. आचार्य अत्रे यांनी आपल्या मराठा या दैनिकात पहिल्यांदा शिवसेना या शब्दाचा प्रयोग करत संघटनेबाबत भाष्य केलं. आचार्य अत्रे यांचे प्रबोधनकार ठाकरे यांच्याशी जवळचे संबंध होते तर बाळासाहेब ठाकरे सुद्धा अत्रेंच्या मराठा दैनिकात मावळा या टोपण नावाखाली व्यंगचित्र रेखाटायचे. त्यामुळं नंतर फिस्कटलेलं नातं सुरुवातीच्या काळात मात्र गोडी गुलाबीचं होतं. पण अनेकजण असं म्हणतात की शिवसेनेचा प्रयोग हा अत्रेंचा होता, मात्र ठाकरेंनी त्याची अंमलबजावणी केली. प्रबोधनकारांना सुद्धा शिवसेना (Shivsena) या नावाची कल्पना तिथूनच आली असावी.
शिवसेनेची स्थापना:
19 जून 1966 रोजी दादरच्या कदम मॅन्शनमध्ये बाळासाहेब ठाकरे, बंधू श्रीकांत ठाकरे, रमेश ठाकरे आणि वडील प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) चर्चा करत होते. शिवसेना स्थापन करण्याबाबत अनेक वेळा चर्चा झाली मात्र काही न काही अडथळे येतच होते. बाळासाहेब ठाकरे देखील त्रस्त होते पण त्या दिवशी प्रबोधनकार ठाकरे यांना राहवलं नाही आणि त्यांनी बाळासाहेबांना विचारलं, "कधी करतोयस संघटना सुरु?" बाळासाहेब म्हणाले,"करायची आहे मात्र काही सुचत नाहीये". यावर प्रबोधनकार ठाकरे बरसले, "सुचत नाहीये कशाला, आताच करु आपण संघटनेची स्थापना." प्रबोधनकार इथंच थांबले नाही तर त्यांनी कुणालातरी पटकन एक नारळ आणायला सांगितला आणि ठाकरे कुटुंब राहत असलेल्या 77/अ कदम मॅन्शनच्या व्हरांड्यात नारळ फोडून शिवसेनेची स्थापना केली.
आता अनेक ठिकाणी असं दाखवलं गेलंय की शिवसेनेचं नाव ज्या दिवशी संघटनेची स्थापना झाली त्याच दिवशी ठरवण्यात आलं मात्र ते पूर्णपणे चुकीचं ठरतं.
19 मे 1966 रोजी म्हणजेच शिवसेना स्थापनेच्या महिनाभर आधी बाळासाहेब ठाकरे यांना मार्मिकचे संपादक म्हणून चेंबूरच्या विद्यार्थी मंडळाच्या वसंत व्याख्यानमालेला निमंत्रित केलं होतं. त्यावेळी त्यांनी मराठी माणूस या विषयावर दमदार भाषण केलं होतं. मराठी माणसावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध संघटीत होण्याचं आवाहन केलं होत तर मराठी माणसाची पीछेहाट थांबवण्यासाठी शिवसेना नावाच्या एका संघटनेचे घोषणा सुद्धा केली. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी त्यावेळी या संदर्भातील एक बातमी नवाकाळ या वृत्तपत्रात प्रसिद्ध केली होती. ही शिवसेनेची पहिली बातमी. त्यामुळे शिवसेना हे नाव शेवटच्या क्षणी ठरलं हे सत्य नसून शिवसेनेची फक्त स्थापना घाई गडबडीत झाली. अन्यथा मार्मिकच्या कचेरीत सगळं रीतसर नियोजन झालं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :