मुंबई : मागील शैक्षणिक वर्षाच्या दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहता रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या येणाऱ्या शैक्षणिक वर्षात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षांची पूर्वतयारी, उपाययोजनांबाबत राज्यातील प्रातिनिधिक प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक यांची मते आज जाणून घेतली. यावेळी दरवर्षी प्रमाणे फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी बारावी बोर्ड परीक्षा या प्रचलित पद्धतीनेच ऑफलाइन घेण्यात याव्यात असे मत अनेकांकडून मांडण्यात आले आहे.
मागील शैक्षणिक वर्षात सीबीएसई आणि आयसीएसई परीक्षा सुद्धा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहता रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात बोर्डाच्या परीक्षा दोन सत्रात घेण्याचा निर्णय या आधीच दोन्ही बोर्डाने घेतला आहे. त्यामुळे राज्य मंडळ नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. कारण मागील शैक्षणिक वर्षात ऐनवेळी अंतर्गत मूल्यपमानाद्वारे गुण देण्यात यावेत असा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी मूल्यमापन करताना गोंधळ ज्याप्रकारे झाला तो यावर्षी होऊ नये यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे.
त्यामुळे शिक्षण मंत्री प्रा वर्षाताई गायकवाड यांनी राज्यातील शिक्षण विभागातील सर्व अधिकार्यांची व विविध विषय शिक्षक तज्ञ प्रतिनिधींची बैठक घेऊन दहावी व बारावीच्या परीक्षा कधी व कशा घेण्यात याव्यात? विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे किंवा कसे? विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी तयारी आहे किंवा कसे? तसेच पुन्हा कोरोनाची लाट आली तर कसे करावे? याबाबत चर्चा केली. सदर बैठकीमध्ये शासनातर्फे शिक्षण मंत्र्यासोबत शिक्षण सचिव वंदना कृष्णा,आयुक्त विशाल सोळंकी, संचालक दत्तात्रय जगताप, संचालक दिनकर टेमकर , महाराष्ट्र राज्य मंडळाचे सचिव डॉ अशोक भोसले उपस्थित होते.
यावर्षी जून 15 पासूनच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम जवळपास पूर्ण झाला असून बोर्डाच्या परीक्षेसाठी त्यांची तयारी झाली आहे. चाचणी परीक्षा तसेच सत्र परीक्षा होत आहेत, विद्यार्थ्यांची त्यादृष्टीने तयारी झाली आहे. आता परीक्षा पध्दतीत बदल करणे योग्य होणार नाही त्याचप्रमाणे मागील वर्षी कोरोना काळात निकष तयार करून निकाल लावले होते. पुन्हा कोरोनाची स्थिती निर्माण झालीच तर आपली पूर्व तयारी झाली आहे, यावर्षी चाचणी, सत्र परीक्षा झाल्या आहेत व मूल्यमापन झाले आहे, असे मत या सर्वांनी बैठकीत व्यक्त केल्याचे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक मुकुंद आंधळकर यांनी सांगितले.
त्यामुळे प्रचलित पद्धतीप्रमाणेच दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यात याव्यात असे मत व्यक्त केले आहे तरी याबाबत शासन स्तरावर स्वतंत्रपणे आढावा बैठक घेण्यात येईल व अंतिम निश्चितीसाठी तसेच नियोजनासाठी राज्यातील काही इतर तज्ञ, निवडक शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या :