Shivsena MP Sanjay Raut on Maharashtra Political Crisis : मी शिवसेनेचा (Shiv Sena) मुख्यमंत्री करुन दाखवला, तुम्ही तो करुन दाखवणार का? असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाला विचारला आहे. इथली स्वाभिमानाची मिठ भाकरी सोडून, तुम्हाला तिकडे स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून चाकरीच करावी लागेल, असंही त्यांनी शिंदे गटाला सांगितलं आहे. त्यासोबतच उद्या दुपारनंतर ईडी चौकशीला सामोरं जाणार असल्याचंही त्यांनी संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.


शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "शिवसेना पक्षप्रमुख यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांनी स्वतः राज्यपालांकडे जात आपला राजीनामा दिला. त्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील नाहीतर, देशाच्या जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रात कशी परिस्थिती निर्माण करण्यात आली आणि त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला, हे त्यांनी अत्यंत संयमी आणि सभ्य भाषेत सांगितलं. त्यावेळी त्यांनी आपल्या लोकांनी दगाबाजी केली, खंजीर खुपसले, हे सुद्धा त्यांनी सांगितलं. अशाप्रकारे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर खुर्चीला चिकटून राहण्यात अर्थ नव्हता. कारण ठाकरे कधीही सत्तेचे लोभी नव्हते आणि नाहीत."


"एका विशिष्ट परिस्थितीत शरद पवार आणि काँग्रेस नेतृत्त्वानं उद्धव ठाकरेंना राज्याची धुरा सांभाळण्याची विनंती केली आणि म्हणून त्यांनी ती स्विकारली. आज जे महाविकास आघाडीच्या विरोधात तोंडाची डबडी वाजवत आहे, शरद पवार, संजय राऊतांना दोष देत आहेत. हे मंत्री जे महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात सामील झाले. त्यांना उत्तम खाती मिळाली, कोणीही तेव्हा विरोध केला नाही. महाराष्ट्रात अनोखा प्रयोग होतोय, अशीच त्यांची सर्वांची भूमिका होती. हाच प्रयोग पुढची 25 वर्ष चालायला हवा, अशी त्यांची वक्तव्य होती. त्यामुळे आता कोणत्याही कारणामुळं बाहेर पडायचंय, खंजीर खुपसायचाय, दगाबाजी करायचीये म्हणून कारण का देता? यासर्व प्रकरणात राष्ट्रवादीला, काँग्रेसला किंवा शरद पवारांना दोष देतायत, यापैकी बहुसंख्य लोकांचं पालनपोषण हे राष्ट्रवादीत झालंय आणि फक्त मंत्रिपदासाठी ते आपल्याकडे आले होते. त्यांना आपण सामावून घेतलं.", असं संजय राऊत म्हणाले. 


त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं, सरकार पाडण्याचं; ते त्यांनी करुन दाखवलं : संजय राऊत 


"तरी त्यांच्यात काही हाडाचे, कडवट शिवसैनिक ते गेल्याचं आम्हाला दु:ख आहे. कालपर्यंत आम्ही त्यांच्याबाबत भावना व्यक्त करत होतो. उद्धवजी व्यक्त करत होते, तुम्ही या म्हणून. पण शेवटी काल त्यांना जे कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं, सरकार पाडण्याचं ते त्यांनी करुन दाखवलं.", असं संजय राऊत म्हणाले. 


मी ईडीसमोर हजर राहीन, कोणत्याही प्रकारची कारवाई झाली तरी, त्याला सामोरं जाईल : संजय राऊत 


राऊतांनी जय महाराष्ट्र असं म्हणत ट्वीट केलंय, त्याबाबात बोलताना ते म्हणाले की, "मी नेहमीच सकाळी जय महाराष्ट्र करतो. आज त्यासोबत शिवसेनेचं धनुष्यबाण टाकलं. कळावं की, धनुष्यबाण जिवंत आहे. जय महाराष्ट्र हा आमचा मंत्र आहे. आज इथे बसलोय, शिवसेनेचं मीठ खातो आणि पंधरा मिनिटांनी पळून गेलो, कुठे गेले? कुठे गेले? ही आमची औलाद नाही. इथेच, बहुदा उद्याच दुपारनंतर मी ईडीसमोर हजर होणार आहे. मी माझी भूमिका स्पष्ट करेल. मला पक्षाच्या कामापासून रोखण्यासाठी, महाराष्ट्राच्या कामापासून रोखण्यासाठी हे सर्व दबाव सुरु आहेत. या दबावांना बळी पडून आमचे काही लोक पळून गेले असले, तरी मी उद्या ईडीसमोर हजर राहीन, कोणत्याही प्रकारची कारवाई झाली तरी मी त्याला सामोरं जाईल."