Maharashtra Political Crisis Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात वादळ आलं. याच बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार मुंबईत परतण्याची शक्यता आहे. शिंदे गट काल रात्री गोव्यातील ताज कन्व्हेंन्शन सेन्टर या हॉटेलमध्ये मुक्कामी होते. गोव्यातून हे बंडखोर आमदार मुंबईत परतण्याची शक्यता आहे. या बंडखोरांच्या स्वागतासाठी भाजपनं जय्यत तयारी केली आहे. दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सीआरपीएफचे दोन हजार जवान मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे कडक सुरक्षाव्यवस्थेत शिंदे गटाची घरवापसी होणार आहे. महाराष्ट्रात वापसी झाल्यानंतर शिंदे गटाचा पुढचा प्लॅन काय असेल याकडं साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं आणि राज्यातील सत्तासंघर्षाची सुरुवात झाली. शिवसेनेतील काही आमदारांसह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. एकापाठोपाठ एक आमदार आणि मंत्री एकथान शिंदेंच्या गटात सामील होऊ लागले. खरं तर तेव्हापासूनच महाविकास आघाडी सरकारचं काउंटडाऊन सुरु झालं होतं. भावनिक साद, आवाहन, अल्टिमेटम सर्व काही करुन झालं पण बंडखोर आमदार आपल्या भूमिकेवर ठाम होते. आरोप-प्रत्यारोपांची सत्र रंगली आणि अखेर या राजकीय नाट्यावर पडदा पडला तो म्हणजे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यामुळे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह केलेल्या बंडामुळं राज्यात गेले दहा 10 दिवस राजकीय नाट्य पाहायला मिळालं. राज्यातील राजकीय भूकंपाचं केंद्र सूरत ते गोवा व्हाया गुवाहाटी असं सरकत गेलं आणि उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानं या राजकीय नाट्यावर पडदा पडला.
शिंदे गटाला 6 कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री पद
भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये संभाव्य मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये भाजपच्या कोट्यात 18 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री पदासह 28 मंत्री असणार आहे. तर, शिंदे गटाला 6 कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री पद देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजप आणि एकनाथ शिंदे गटात झालेल्या चर्चेनुसार, दर 6 आमदारांमागदे एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीप पद दिले जाऊ शकते. मात्र, खाते वाटपाचे हे सूत्र अंतिम झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सहा आमदारांमागे एक मंत्री या सूत्रानुसार भाजपला फायदा होणार आहे. भाजपकडे या सूत्रानुसार 28 मंत्रीपदे मिळणार आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असल्याची माहिती समोर येत आहे