मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा जोर हा दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त आहेत. महाराष्ट्रात भायवह अशा प्रकारची स्थिती आहे. उत्तर प्रदेशमध्ये तर रुग्णांची नोंदच होत नाही, त्यामुळे पुढच्या महिनाभरात उत्तर प्रदेशमध्ये काय होईल हे सांगता येत नसल्याचे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. निवडणूक आयोगाने काही निर्बंध घातले आहेत, ऑनलाईन प्रचार करा असे त्यांनी सांगितले आहे. पण हे कागदावर सगळे ठिक आहे. मात्र, निवडणूक आयोगाने याप्रकारचे स्पष्ट आदेश पंतप्रधान आणि भाजपच्या अध्यक्षांना द्यावेत. कारण त्यांच्यासाठी कोणते नियम नसतात. इतरांसाठी नियम असतात. हे आम्ही पश्चिम बंगालच्या निवडणुकीत बघितले आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या बाबतीत तरी समान कायदा असावा असे राऊत यावेळी म्हणाले.
निवडणूक आयोगाने निवडणुका वेळेत जाहीर केल्या हे ठीक आहे, मात्र, लोकांचे आरोग्य, त्यांचा जीव महत्त्वाचा आहे, याचा विचार निवडणूक आयोगाने केला नसल्याचे राऊत यावेळी म्हणाले. तसेच काही दिवस निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात, पण काही जणांना निवडणुका उरकण्याची घाई झाल्याचे राऊत म्हणाले. निवडणुका होत असलेल्या ५ राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती चांगली नाही. त्यामुळे निवडणुक आयोगाने काही निर्बंध घातले आहेत. त्यांनी पंतप्रधान आणि भाजपच्या अध्यक्षांना निर्बंध पाळण्याचे आदेश द्यावेत असे राऊत म्हणाले.
गोव्यात आघाडीसाठी आणखी प्रयत्न
गोव्यात काँग्रेसबरोबर आघाडी व्हावी असे आम्हाला सतत वाटत आहे. त्यामुळे आम्ही आणखी आघाडी करण्याचे प्रयत्न करत असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्रासारखा एक प्रयोग गोव्यात करावा असे आम्हाला वाटत आहे. आम्ही यासाठी मनापासून प्रयत्न केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रफुल्ल पटेल यांनी प्रयत्न केले. मात्र, त्यांना वाटते की, गोव्यात ते स्वबळावर सत्ता आणू शकतात. तसे संकेत काँग्रेसने दिल्लीत दिले असतील, त्यामुळेच ते मागे पुढे करत आहेत. काँग्रेसने आम्हाला काही जागा ऑफर केल्या आहेत, पण आमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यामुळे एकत्र निर्णय व्हायला हवा असेही राऊत यावेळी म्हणाले. आम्हाला जागा ऑफर केल्या म्हणजे आम्ही लगेच जाऊ असे नाही. त्यामुळे आमचे प्रयत्न सुरू आहेत. नाहीतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य स्थानिक पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढवणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
उत्पल पर्रिकर यांनी हिंमत दाखवावी
गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला आत्तापर्यंत भाजपने तिकीट दिले नाही, मग शिवसेना त्यांना तिकीट देणार का? असा सवाल संजय राऊत यांना केला असता राऊत यांनी सांगितले की, उत्पल पर्रिकर यांनी हिंमत दाखवायला हवी. जर पर्रिकर यांच्या कुटुंबाने हिंदुत्ववादी म्हणून शिवेसेनेबरोबर संबंध जोडण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना नक्कीच त्यांच्यासाठी ताकद पणाला लावेल असे राऊत म्हणाले. उत्पल पर्रिकर यांच्या वडिलांनी भाजपला गोव्यात एक स्थान निर्माण करुन दिले आहे. गोव्यात भाजप रुजवली आहे. त्यांच्याच प्रतिमेवर गोव्यात भाजप टिकला आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर यांच्यावर अवलंबून आहे, त्यांनी काय करावे ते, शेवटी राजकारणात धाडसाने काही निर्णय घ्यावे लागतात असेही राऊत यांनी यावेळी सांगितले. भाजपला मुख्य पर्याय म्हणून भविष्यात गोव्याचे लोक शिवसेनेचा विचार करतील असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सध्या जमिनीवर चार हात चालत आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. कधी काळी गोव्यातही भाजपला कोणी विचारत नव्हते. त्यामुळे येणाऱ्या काळात गोव्यात भाजप राहते की शिवसेना राहते हे कळेल असेही राऊत म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवण्यात काही गैर नाही. मोठ्या पक्षांना आपल्या कार्यकर्त्यांना समाधानी करणं कठीण असतं. आमची आघाडी राज्यासाठी आहे. जिथे आघाडी शक्य तिथे लढू, जिथे शक्य नाही तिथे लढणार नाही. पक्षाचा विस्तार करण्याचा सर्वांना अधिकार आहे. कधीकाळी भाजप आणि सेना देखील स्थानिक स्वराज्य संस्थेत वेगळे लढले आहेत, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: