Maharashtra Politics : शिवसेना (Shiv Sena) पक्षाला 56 वर्ष पूर्ण झाली आणि पाच दशकात शिवसेनेला अनेक वेळा भगदाड पडलं. कधी मोठे नेते सोडून गेले तर कधी जवळचे सहकारी सोडून गेले, तर कधी नातेवाईकच दूर झाले. शिवसेनेची रचना पाहिली तर नेत्यांच्या फळ्या आहेत. बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, दत्ता प्रधान, लीलाधर डाके, दत्ता साळवी, बळवंत मंत्री, हेमचंद्र गुप्ते ही नेते मंडळी शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते. यानंतर सुभाष देसाई, आनंद दिघे, गजानन कीर्तिकर, एकनाथ शिंदे दिवाकर रावते ही शिवसेनेची दुसरी फळी तर संजय राऊत, छगन भुजबळ, गणेश नाईक, राज ठाकरे, बाळा नांदगावकर, नारायण राणे ही  शिवसेनेची तिसरी फळी होती. 


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एक व्यक्ती म्हणून शिस्तबद्ध होते आणि तिच शिस्त त्यांनी पक्षालाही लावली. मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आत्मसाद केलेली शाखा संस्कृती शिवसेनेच्या वाढीचं मुख्य कारण ठरली. शाखांच्या विस्ताराची जबाबदारी त्याकाळी दत्त प्रधान यांच्याकडे होती. 


1966 साली कदम मेन्शनच्या व्हरांड्यात सुरु झालेला प्रवास हा मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत येऊन पोहोचला. मात्र या 56 वर्षांच्या कालखंडात शिवसेनेनं जितकं मिळवलं तितकं गमावलं सुद्धा. अनेक बड्या नेत्यांनी सेनेला रामराम ठोकला, अनेकांनी बंड केलं, मात्र एक महत्वाची बाब म्हणजे, याचा फरक शिवसेनेवर दीर्घकाळ राहिला नाही. पक्ष पुन्हा उभा राहिला. शिवसेनेची स्थापना होताच पुढील वर्षभरातच शिवसेनेत पाहिला बंड झाला होता. त्यामुळे बंडखोरी पक्षासाठी कधीच नवीन नाही.... 


शिवसेनेत झालेले महत्त्वाचे बंड कोणते? 


बळवंत मंत्री : शिवसेनेत लोकशाही नाही?


बळवंत मंत्री हे शिवसेनेचे संस्थापक सदस्य होते, तर शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात संघटनेत बाळासाहेब ठाकरे यांच्या खालोखाल त्यांचीच जागा होती. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या वाणीनं तरुणांना भुरळ घातली होती आणि त्यामुळे शिवसैनिकांसाठी बाळासाहेबांपेक्षा मोठं कुणीच नव्हतं. शिवसेनेतही बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द शेवटचा मानला जायचा. हीच गोष्ट बळवंत मंत्री यांना पटली नाही आणि त्यांनी शिवसेनेत लोकशाही हवी, अशी मागणी करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी एक छोटेखानी सभा बोलावली होती. मात्र शिवसैनिकांनी ती सभा उधळून लावली आणि बळवंत मंत्री यांची दादरच्या वनमाळी हॉल ते शिवाजीपार्क येथील बाळासाहेबांच्या राहत्या घरापर्यंत धिंड काढली.         


हेमचंद्र गुप्ते : फॅमिली डॉक्टर ते बंडखोर नेता


दादरच्या खांडके बिल्डिंगमध्ये दवाखाना असलेले डॉ. हेमचंद्र गुप्ते हे ठाकरे कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर होते. बाळासाहेब अगदी लहान असल्यापासून प्राथमिक उपचार गुप्तेंकडूनच घ्यायचे. 1969 साली जेव्हा शिवसेनेनं मुंबई मनपाची निवडणूक लढवली, तेव्हा प्रजा समाजवादी पक्षासोबत त्यांनी युती केली होती. या निवडणुकीत डॉ. गुप्ते हे अपक्ष लढणार होते. हे कळताच बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेतून उमेदवारी ऑफर केली मात्र डॉ. गुप्तेंनी ती नाकारली. मात्र विजयानंतर डॉ. गुप्ते शिवसेनेत सामील झाले आणि पक्षातही त्यांना मान मिळू लागला. पुढे 1971 साली शिवसेनेनं महापौर पदाची निवडणूक लढवली आणि त्यासाठी देखील बाळासाहेबांनी हेमचंद्र गुप्तेंना उमेदवारी दिली. या निवडणुकीत सेनेचा विजय झाला आणि डॉ. हेमचंद्र गुप्तेंच्या रूपात शिवसेनेला पहिला महापौर मिळाला. मात्र गुप्ते-ठाकरे यांचं बिनसलं ते 1977 साली. बाळासाहेबांनी पक्षीय धोरणाला बगल देत काँग्रेसच्या मुरली देवरा यांना महापौर पदासाठी पाठिंबा जाहीर केला आणि डॉ. हेमचंद्र गुप्तेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकला. गुप्तेंना तो निर्णय पाटला नाही आणि ते पक्षातून बाहेर पडले. पुढे त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि तत्कालीन विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या मनोहर जोशी यांचा दारुण पराभव केला. 


बंडू शिंगरे : प्रतिशिवसेना आणि प्रतिशिवसेना प्रमुख


1969 साली झालेल्या मुंबई मनपा निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळालं. पक्षाचे तब्बल 40 उमेदवार एकाच फटक्यात निवडून आले होते आणि या यादीतील एक नाव म्हणजे, भाई शिंगरे. भाई शिंगरे यांचे बंधू बंडू शिंगरे यांचा लालबाग-परळ परिसरात चांगलाच दबदबा होता. दादागिरीतही ते इतरांपेक्षा एक पाऊल पुढेच होते. 1970च्या दक्षकातील गोष्ट आहे, महागाई चांगलीच वाढली होती आणि सर्वसामान्यांचे हाल होत होते. याचं एक कारण होतं साठेबाजार. दरम्यान चोरबाजार येथील डंकन रोडवरील कांद्या-बटाट्याची काही गोदामं फोडून शिवसैनिकांनी मुंबईकरांना स्वस्त दराने कांदे-बटाटे उपलब्ध करून दिले होते. त्यावेळी बंडू शिंगरे यांच्यावर पैशांच्या अफरातफरीचा आरोप झाला आणि बाळासाहेब ठाकरे यांनी त्याला पक्षाच्या भर बैठकीतून बाहेर काढलं. बंडू शिंगरे चांगलेच खवळले होते आणि त्यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांना आपल्या रडारवर ठेवलं. त्यानंतर ते नेहमीच बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात बोलू लागले. स्वारी इथंच थांबली नाही तर बाळासाहेबांना विरोध करण्यासाठी त्यांना प्रतिशिवसेनेची स्थापना केली आणि स्वतःला प्रतिशिवसेनाप्रमुख अशी उपाधीसुद्धा लावली. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं वागणं काही बंडू यांना जमलं नाही आणि काहीच दिवसांत त्यांची प्रतिशिवसेना मरगळली. शिवसेनेला खिंडार पडण्याचा त्यांचा हा प्रयोग पुरता फसला.


छगन भुजबळ : महापौर, आमदार आणि बंड


छगन भुजबळ म्हणजे, राज्यातील एक फायरब्रँड नेते. हेच भुजबळ कधीकाळी शिवसेनेत होते. शिवसेनेसाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली होती. मुंबईच्या माझगाव भागांत बाळासाहेबांनी छगन भुजबळ यांना शाखाप्रमुख केलं. त्यानंतर 1973 सालच्या मुंबई मनपाच्या निवडणुकीचं तिकीटसुद्धा दिलं. दिलेल्या संधीचं भुजबळांनी सोनं केलं आणि जिंकून आले. पूढे 1985 साली छगन भुजबळांना बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईच्या महापौर पदी सुद्धा बसवलं होतं. त्याच झालेल्या विधान सभा निवडणुकीत बाळासाहेबांनी त्यांना पुन्हा तिकीट दिल आणि भुजबळ आमदार झाले.  पुढे 1990 साली शिवसेनेला विधानसभेत चांगलंच यश मिळालं. अनेक आमदार निवडून आले आणि पक्ष विरोधी बाकावर बसला. असं म्हणतात की, छगन भुजबळ यांनी विरोधीपक्ष नेता होण्याची इच्छा होती. मात्र ते पद बाळासाहेबांनी मनोहर जोशी यांच्या पारड्यात पडलं. नाराज झालेल्या छगन भुजबळ यांनी 1991 साली शिवसेनेला कायमचा जय महाराष्ट्र केला आणि पक्षाविरुद्ध बंड पुकारलं. त्यावेळी भुजबळांनी 18 आमदार फोडले होते, तर त्यातील 12 हे पुन्हा शिवसेनेत परतले. 


माधव देशपांडे : बाळासाहेबांवर घराणेशाहीचे आरोप


1992 सालची  गोष्ट आहे, शिवसेनेचा राज्यभरात चांगलाच विस्तार झाला होते. मराठवाडा नामांतरासारख्या विषयांमध्ये बाजू मांडत पक्ष कानाकोपऱ्यात नेला.
मात्र याच दरम्यान ठाकरे कुटुंबातील दोन लहान मुलं मोठी होत होती. बाळासाहेब ठाकरे यांचे फट्या आणि दादू म्हणजेच, राज आणि उद्धव ठाकरे. 80च्या दशकात राज ठाकरे 20 वर्षांचे असताना त्यांच्यावर भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी टाकली तर उद्धव ठाकरे यांना 1989 साली सामानाची जबाबदारी देण्यात आली. ठाकरे घराण्यातील दोन्ही मुलं आता थोडं फार का होईना राजकारणात सक्रिय झाली होती. मात्र हीच बाब अनेकांना खटकली आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर घरणेशाहीचे आरोप होऊ लागले. दुसरं तिसरं कुणी नाही तर शिवसेनेचं सहसंस्थापक माधव देशपांडे यांनीच हा आरोप बाळासाहेबांवर केला होता आणि शिवसेनेविरुद्ध बंड पुकारलं. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी मी राजीनामा देतो, असं म्हणत राज्यभरात धुरळा उडवला. जुलै महिन्यात त्यांनी पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामानात 'जय महाराष्ट्र' अशी हेडलाईन देत स्पष्ट इशाराच दिला. मात्र कट्टर शिवसैनिक जुलैच्या त्या भर पावसात मातोश्री बाहेर जमले आणि बाळासाहेबांची मनधरणी केली. काही वेळ गेला आणि त्यांना यशही आलंच, कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला.
 
नारायण राणे : सत्तासंघर्ष आणि बंडखोरी


नारायण राणे यांचा शिवसेनेतील प्रवास  म्हणजे साधा कार्यकर्ता ते मुख्यमंत्री. बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना फार काही दिल हे स्वतः राणे मान्य करतात मात्र त्यांच्यात बिनसलं ते 2003 साली. त्यावर्षी उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचं कार्यध्यक्ष घोषित करण्यात आलं आणि पक्षात नाराजीचा सूर दिसू लागला. सत्तासंघर्षात नारायण राणे मागे पडत होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान नारायण राणे यांच्यावर शिवसेनेविरुद्ध कुरघोड्या करण्याचे अनेक आरोप झाले आणि अखेर 2005 साली बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना पक्षातून बाहेर केलं. मात्र नारायण राणे यांनीसुद्धा बंड पुकारलं आणि काही आमदारांसोबत ते शिवसेनेतून बाहेर पडले.


राज ठाकरे : शिवसेना नाही घर तुटलं


बळवंत मंत्री ते नारायण राणे, बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक बंड पाचवली मात्र पूढे होणारा राडा त्यांच्यासाठी वेदनादायी होता. याचं कारण म्हणजे, या बंडाच्या यादीत नंबर लागणार होता खुद्द राज ठाकरे यांचा. वयाच्या 18व्या वर्षांपासून राज ठाकरेंनी स्वतःना शिवसेनेसाठी झोकून दिलं. भारतीय विद्यार्थी सेनेची सुद्धा कामगिरी ते चांगलीच बजावत होते मात्र उद्धव ठाकरे आणि त्यांच्यामधला दुरावाही ठळक जाणवायचा. 2003 साली महाबळेश्वरच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या कार्याध्यक्ष पदी नेमण्याचा प्रस्ताव मांडला आणि ते बहुमताने त्या पदावर विराजमान झाले. यानंतर 2004 साली शिवसेनेचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला आणि पहिल्यांदाच राज यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. हळू दोघांमधील अंतर वाढत गेलं आणि २पू  सालच्या नोव्हेंबरमध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला तर डिसेंबर महिन्यात शिवसेना पक्षातून बाहेर पडले. पूढे राज यांनी स्वतःची चूल मांडायची ठरवलं आणि बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच एका पक्षाची स्थापना केली. तो पक्ष म्हणजे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना.


एकनाथ शिंदे : शिवसेना न सोडण्यावर ठाम


एकनाथ शिंदे, शिवसेनेचे महत्वाचे नेते आणि बाळासाहेब ठाकरे यांचे प्रमुख शिलेदारांपैकी एक. एकनाथ शिंदे बंड पुकारतील असं कुणालाही वाटलं नसेल मात्र राजकीय आकांक्षेपोटी त्यांनाही निर्णय घ्यावा लागला. एकनाथ शिंदे यांनी या मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. मात्र महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाईंचं नाव शर्यतीत होतं, पण दोन्ही नेत्यांचा हिरमोड झाला. दुसरं म्हणजे, एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत झालेली युती अजिबात पटली नाही. अखेर सत्तेच्या अडीच वर्षांनी हिंदुत्ववादाची हाक देत उद्धव ठाकरेंच्या भूमिकेविरुद्ध बंड पुकारला.