Maharashtra Mumbai Rain : सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यातील मुंबईसह, ठणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही चांगला पाऊस सुरु असल्याचं दिसत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात 8 जुलै ते 12 जुलै या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभगानं वर्तवली आहे. त्यामुळं नागरिकांवी नागरिकांनी सावधानता बाळगावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. तसेच रायगडमध्येही चांगला पाऊस सुरु आहे. या पावसामुळं वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. तसेच सिंधुदुर्गमध्ये देखील चांगला पाऊस सुरु आहे.
हिंगोलीत पावसाचा हाहाकार
हिंगोली जिल्ह्यातील कृष्णा भागामध्ये पावसानं हाहाकार घातला आहे. तिथे ढगफुटीसदृश्य पाऊस पडला आहे. रात्री रात्रभर झालेल्या पावसानं कुरुंदा गावाजवळ असलेल्या आसना नदीला पूर आला आहे. पाणी नदी पत्रातून थेट कुरुंदा गावात शिरलं आहे. गावात सर्वच्या घरात पाणी शिरलं होतं. यामुळं घरातील संस्कार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे. जोरदार झालेल्या पावसाने गावातील मोबाईल नेटवर्क त्याचबरोबर विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झाला आहे.
लातूर आणि परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग
मागील अनेक दिवसांपासून लातूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती. लातूर जिल्ह्यातील अनेक भागात पेरणीलायक पाऊस झाला नव्हता. सकाळपासून अनेक भागांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. संध्याकाळनंतर मात्र पावसानं चांगलाच जोर धरला आहे. सततच्या पावसामुळे वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे.
संततधार पावसानं हिवरा येथील पुल गेला वाहून
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील शुक्रवारी सकाळपासून सुरु झालेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळं हिवरा (जगताप) येथील अजनसरा लगत असलेला हिवरा येथील पूल वाहून गेला आहे. अचानक पुल वाहुन गेल्याने नागरिकांना आपला जीव मुठीत धरुन घर जवळ करावं लागत आहे.
कोकणासह, पश्चिम महाराष्ट्रारातील काही भागात रेड अलर्ट
राज्यात पुढचे चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापूरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भातही चांगला पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.