दरम्यान, शिवसेनेने नेता निवडीनंतर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्याने राज्यात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना भाजपवर दडपण टाकण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जातं आहे. सरकार स्थापनेबाबत उद्धव ठाकरे जे बोलतील तो शेवटचा शब्द असेल असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच अतिवृष्टीमुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी या मागणीसाठी आम्ही राज्यापालांची भेट घेतली. नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि मच्छिमारांना मदत मिळावी अशी मागणी केल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. राज्यपालांनी आम्हाला राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचे आदेश देण्याबाबत आश्वासन दिले असल्याचंही म्हणाले.
परतीच्या पावसाने थैमान घातलं असताना राज्यात 7 नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच पुढचे 48 तास पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजाने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
दरम्यान मराठवाडा, विदर्भात आधी दुष्काळ, पश्चिम महाराष्ट्रात महापुरानं शेतकऱ्याना आधीचं मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावं लागलं आहे. अशातचं परतीच्या पावसाचा फटका राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना बसतो आहे.
राज्यात परतीच्या पावसाचा फटका
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात टाकरवन इथं पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. पावसाने खरीपाची सर्व पिकं जमीनदोस्त झाली आहेत.
विदर्भातही सोयाबीन, कापुस, मका, ज्वारी, उडीद, मुग, यासह इतर पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालं आहे.
पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातही द्राक्षबागांचं मोठं नुकसान झालंय. पीकं वाचवण्यासाठी शेतकरी पिकांवर औषध फवारणी करतायेत पण चिखलात ट्रॅक्टर रुतल्यानं मोठ्या संकटांना सामोरं जावं लागतंय.
उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसानं सर्वाधिक नुकसान केलं आहे. धुळ्यात निराश शेतकऱ्याने बाजरी कणसासह पेटवून दिलीय तर नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात चक्रीवादळामुळे घरे आणि शाळेच्या इमारतीचे पत्रे उडून पडझड झाली आहे.
कोकणातही भातशेतीला मोठा फटका बसला आहे. कोकणातील 70 टक्के व्यवसाय हा शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे पावसामुळे कोकणातील शेतकरी चांगलाच हवालदील झाला आहे.
Return Rain Effect | परतीच्या पावसामुळे खरीपाची पिकं जमीनदोस्त | ABP Majha
संबंधित बातम्या
मुख्यमंत्र्यांनी 'ते' वक्तव्य करायला नको होतं, म्हणून चर्चा फिसकटली : उद्धव ठाकरे
शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसचे राज्यातील नेते सकारात्मक
आदित्य ठाकरेंनी प्रस्ताव मांडला, एकनाथ शिंदे शिवसेनेच्या गटनेतेपदी कायम