मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये सत्तास्थापनेवरुन सुरु असलेला संघर्ष अद्याप संपलेला नाही. मुख्यमंत्री पदावरुन युतीतील तणाव वाढत असताना सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यास राज्यातील काँग्रेस नेते सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यासंदर्भात काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट घेणार आहेत, अशी माहितीही मिळत आहे.


दरम्यान बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काही काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. राष्ट्रवादी विरोधी पक्षाच्या बाकावर बसणार असल्याचं शरद पवारांनी याआधीच स्पष्ट केलं आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसनं आधी भूमिका ठरवावी, असं मत शरद पवारांनी मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


काँग्रेसच्या प्रस्तावानुसार आघाडीने शिवसेनेला पाठिंबा दिला. शिवसेनेचे 63 (अपक्ष आमदारांसह), काँग्रेसचे 49 (मित्रपक्षांसह) आणि राष्ट्रवादीचे 56 असं एकूण 168 संख्याबळ होतं. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठणे, या नव्या राजकीय समीकरणाला सहज शक्य आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन करतील, याची शक्यता फार कमी आहे.


आज शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, आपण मित्रपक्षाला शत्रू पक्ष मानत नाही. अमित शाहांसोबतच्या बैठकीत जे ठरलंय ते करावं, आम्ही स्थिर सरकार देऊ. शिवसेना भाजपमधली चर्चा फिसकटली आहे, मात्र मला खात्री आहे, सगळं सुरळीत होईल.


शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरुन संघर्ष सुरु आहे. युतीच्या चर्चेदरम्यान अडीच-अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद असं ठरलं होतं, असं शिवसेनेचे नेते सांगतं आहेत. मात्र युतीच्या बैठकीदरम्यान असा कोणताही शब्द दिला नव्हता, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.


विधानसभा निवडणुकीत भाजप 105 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या आहेत. मात्र भाजप शिवसेनेशिवाय सत्तास्थापन करु शकत नाही. हीच संधी साधून शिवसेनेने भाजपवर सत्तास्थापनेवरुन दबावतंत्र सुरु केलं आहे.