नाशिक : मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजप 'आमचं ठरलंय' सांगत असले, तरी स्थानिक पातळीवर काहीशी धुसफूस दिसत आहे. नाशकातील नगरसेविकेने मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असं होर्डिंग लावल्याने सेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

भाजप प्रभारी सरोज पांडे यांनी मुख्यमंत्री भाजपचाच होणार, असं वक्तव्य काल नाशिकमध्ये केलं होतं. त्यानंतर नाशिकमधील शिवसेना नगरसेविका किरण गामणे यांनी भाजप कार्यालयासमोरच होर्डिंग लावलं आहे.

'मुख्यमंत्री शिवसेना भाजपा युतीचाच होणार... याचा अर्थ शिवसेनेचाच होणार' असं या होर्डिंगवर लिहिलं आहे. त्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचे फोटो आहेत. भाजप कार्यालयासह शहरात दोन-तीन ठिकाणी होर्डिंग लावले आहेत.

Saroj Pande | विधानसभा निवडणूक युतीतच, मात्र मुख्यमंत्री भाजपाचाच, सरोज पांडेचं वक्तव्य



कुणी कितीही दावे करु द्या, मुख्यमंत्री भाजपचाच होणार, असं वक्तव्या सरोज पांडे यांनी केलं होतं. नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडल्यानंतर त्या 'एबीपी माझा'शी बोलत होत्या. या प्रकारचे मुद्दे हे माध्यमनिर्मित असतात, अशी सावध प्रतिक्रिया शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली होती. सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र मुख्यमंत्री महायुतीचा असेल असं म्हणत सावरण्याचा प्रयत्न केला.