कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेतील नगरसेविकेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. शिवसेनेच्या नगरसेविका माधुरी काळे आणि त्यांचे पती प्रशांत काळे यांच्यावर हल्ला झाला आहे. विशेष म्हणजे शिवसेना पदाधिकाऱ्यांनीच हा हल्ला केल्याचा आरोप आहे.
बुधवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास माधुरी आणि प्रशांत काळे हे दाम्पत्य स्कूटरवरुन चाललं होतं. त्यावेळी पाच बाईकवर आलेल्या दहा जणांनी घरापर्यंत आपला पाठलाग केला, त्यानंतर घराजवळ पोहचल्यानंतर धारदार हत्यारं आणि लाकडी दांडक्याच्या सहाय्याने त्यांनी मारहाण केली, असा आरोप दोघांनी केला आहे. मारहाणीत काळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शिवसेनेचे पदाधिकारी संजय गायकवाड आणि संजय मोरे यांच्या सांगण्यावरुन हल्ला झाल्याचा आरोप काळेंनी केला आहे. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्यात शिवसेना शहर संघटकासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक झालेली नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.