उस्मानाबाद: नोटाबंदीच्या काळात घालून दिलेल्या मयार्देपेक्षा अधिक रक्कम खात्यात जमा करणाऱ्या देशातल्या १८ लाख जणांना आयकर विभागानं नोटीस बजावली आहे. त्यात मराठवाड्यातले ४०० जण आहेत. मागच्या पाचचं दिवसात आयकर विभागानं मराठवाड्यातून २६ कोटीचं काळ धन जप्त केलं आहे.
आयकर विभागाच्या चौकशीत अनेक बाबी समोर येत आहेत. परळीच्या एका कारखान्याने जुन्या नोटा खपवण्यासाठी आपल्या कामगारांना १ कोटी ३० लाखाचा आगाऊ पगार दिला आहे. आजही बीड आणि उस्मानाबाद मध्ये आयकर विभागाची कारवाई सुरु आहे.
नांदेडच्या अर्धापूरचे सलीम कुरेशी जनावरांचे व्यापारी आहेत. उधारीत जनावरं खरेदी करुन कुरेशी कंपनीला विकत होते. नोटाबंदीच्या काळात कुरेशींच्या खात्यात अडीच कोटींचा व्यवहार झाल्याचं निष्पन्न झालं. कुरेशींना आयकर विभागाची नोटीस आली.
आयकर विभागाने १ मार्च ते ३१ मार्च या काळासाठी क्लीन अप मिशन हाती घेतलं. लोक बँकांच्या रांगेत उभे होते आणि मराठवाड्यातल्या शेकडो खात्यात नोटाबंदीच्या काळात अचानक व्यवहार वाढल्याचं दिसून आलं. त्यामुळे तब्बल ४०० जणांना आयकरनं नोटीसा बजावल्या. पाचच दिवसात उपायुक्तांना ३० खात्यात मिळून २६ कोटींच काळं धन सापडलं.
नोटाबंदीच्या काळात वैयक्तिक खात्यात अडीच लाखाहून अधिक आणि कंपनी खात्यात २५ लाखाहून अधिकची उलाढाल झालेली खाती बाजूला काढली आहेत. त्यांचे तीन प्राध्यान्यक्रम केले आहेत.
पहिल्या वर्गातल्या खातेधारकांना ३१ मार्चपर्यंत उत्तर देण्याची नोटीस बजावली आहे.
नोटाबंदीच्या काळात देशभरात ज्या खात्यात संशयास्पद व्यवहार झाले आहेत अशा १९ लाख जणांना आयकरनं नोटीसा बजावल्या आहेत. काही खात्यातले व्यवहार कायदेशीर आहेत. पण बऱ्याच खात्यात झालेल्या व्यवहाराची योग्य कारणं देता आलेली नाहीत. त्यामुळं सगळी कारवाई पूर्ण झाल्यावर नोटाबंदीचा नेमका काय फायदा झाला हे मोदी सरकार जाहीर करु शकतं.
संबंधित बातम्या: