मुंबई : शिवसेना पक्षाचा उद्या वर्धापनदिन आहे.  वर्धापन दिनापूर्वी आज शिवसेना ठाकरे गटाचे वरळीत मोठं शिबिर  पार पडणार आहे. त्याआधी ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत.  काल शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आहे. ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यापासून ते आतापर्यंत ठाकरे गटाकडून शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. ठाकरेंच्या महाशिबिराच्या दिवशी  विधानपरिषद  आमदार मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा सुरू आहे 


ठाकरे गटाची  चिंता वाढली 


ठाकरेंच्या महाशिबिराच्या दिवशी एक आमदार शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. आगामी महापालिकेंच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. राज्यात अनेक प्रमुख महापालिकांची मुदत संपली आहे.  येणाऱ्या काळात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातून शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. आतापर्यंत अनेक नगरसेवक, पदाधिका-यांनी ठाकरेंची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरेंकडे विधानसभा आणि विधानपरिषद मिळून मोजकेच आमदार ठाकरेंकडे आहेत. ठाकरेंकडे असणारे आमदार  हळूहळू शिवसेनेत पक्षप्रवेश करू लागल्यानं ठाकरे गटाची  चिंता वाढली  आहे. 


कोण आहेत मनिषा कायंदे?


विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे करणार शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहे. भाजपकडून 2009 ला सायन कोळीवाड्यातून निवडणूक लढल्या होत्या . त्यानंतर 2012 साली त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. 2018  साली त्यांना ठाकरेंनी विधानपरिषदेची जबाबदारी दिली होती .


चुनाभट्टीतील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक तांडेल दांपत्याचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र


चुनाभट्टीतील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक तांडेल दांपत्य यांनीही ठाकरे गट सोडलाय. तेही आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. वर्धापन दिनापूर्वीच ठाकरे गटाला एवढे धक्के बसतायंत. थोडक्यात ठाकरे गटाची गळती थांबण्याचं नाव घेत नाहीए.


शिशिर शिंदे यांचा राजीनामा


कालच  शिशिर शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गट उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनाम्याचं पत्र सुपूर्त केलं. आपल्याला ठाकरे गटात मनासारखं काम करायला मिळत नसल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. पक्षात होणारी घुसमट आपणच थांबवत असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. 


हे ही वाचा :


 स्वार्थी लोक ओळखण्यात आमची चूक, त्यांच्या जाण्यानं शिवसेनेला धक्का नाही : संजय राऊत