मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकासआघाडीचं सरकार दृष्टीक्षेपात असताना आता कोणाला कोणं खातं मिळणार याची चर्चा रंगू लागली आहे. एबीपी माझाच्या हाती महाविकासआघाडीचा संभाव्य फॉर्म्युला हाती लागला आहे. या फॉर्म्युलानुसार संभाव्या मंत्रीमंडळात एकूण 42 मंत्री असण्याची शक्यता आहे. त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येक 15 मंत्री असतील तर काँग्रेसला 12 मंत्रीपदं मिळतील. प्रत्येक चार आमदारांमागे एक मंत्री अशाप्रकारे मंत्रीपदांचं वाटप करण्यात येणार आहे. म्हणजेच शिवसेनेचे (56/ 4 = 14), राष्ट्रवादीचे (54/4 = 13.5 म्हणजेच 14) आणि आणि काँग्रेसचे (44/4 =11)  अशी एकूण 39 मंत्रीपद विभागली जाणार आहेत. 42 पैकी उरलेली 3 मंत्रीपदांचं तिन्ही पक्षांमध्ये वाटप होईल. त्यामुळे शिवसेनेला 14, राष्ट्रवादीला 14 आणि काँग्रेसला 12 मंत्रीपदं मिळतील.


प्रत्येक चार आमदारांमागे एक मंत्री, त्यानुसार –
शिवसेना - 56/4 = 15
राष्ट्रवादी – 54/4 = 15
काँग्रेस – 44/4 = 12
एकूण - 42 मंत्री

महत्त्वाच्या खात्यांचं तिन्ही पक्षांमध्ये वाटप
याशिवाय महत्त्वाची मंत्रीपदं आणि त्याखालच्या मंत्रीपदाचंही वाटप होणार आहे. अर्थ, गृह, नगरविकास आणि महसूल या चार महत्त्वाच्या मंत्रीपदांपैकी प्रत्येकी एक मंत्रीपदांचं तीन पक्षांमध्ये वाटप होईल. तर त्याखालच्या ग्रामविकास, जलसंपदा यांसारखी मंत्रीपदंही तिन्ही पक्षांमध्ये विभागली जातील. तीनही पक्षांना शहरी मंत्रीपदांसह ग्रामीण मंत्रीपदंही मिळणार आहेत. अशाप्रकारे मतभेद होऊ नये यासाठी काळजी घेऊन मंत्रीपदांचं समान वाटप करण्यात येणार आहे.

काँग्रेसकडून उपमुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेब थोरात
या सरकारमध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री पाच वर्षांसाठी असेल. तर दोन उपमुख्यमंत्री असतील, एक काँग्रेसचा आणि दुसरा राष्ट्रवादीचा. आता काँग्रेसकडून उपमुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेब थोरात यांच्या नावाला पसंती मिळाल्याची एक्स्क्लूझिव्ह माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. मागील साडेतीन तासांपासून सुरु असलेली दिल्लीतील काँग्रेस पक्ष मुख्यालयात काँग्रेसच्या राज्यातील बड्या नेत्यांची महत्वाची बैठक संपली आहे. या बैठकीत कालच्या आघाडीच्या बैठकीतील तपशीलासह खातेवाटपावर चर्चा झाली.

विधानसभा अध्यक्षपद माजी मुख्यमंत्र्यांना
काँग्रेसकडून उपमुख्यमंत्रीपदासाठी अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती. परंतु अशोक चव्हाणऐवजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. इतकंच नाही महसूल मंत्रीपदासाठीही पहिली पसंती बाळासाहे थोरात यांनाच असल्याचं कळतं.  यासोबतच विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला मिळाल्यास माजी मुख्यमंत्र्यांची तिथे वर्णी लागण्याची शक्यता आहे. म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण किंवा अशोक चव्हाण यांची विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती होऊ शकते.

शिवसेनेचा मुख्यमंत्री, काँग्रेस-राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद
सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेचाच मुख्यमंत्री पाच वर्षांसाठी असेल. या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील, एक काँग्रेसचा आणि दुसरा राष्ट्रवादीचा. राष्ट्रवादी काँग्रेसने अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी केली होती, परंतु बहुतांश नेते यासाठी राजी झाले नाही. काँग्रेसच्या उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय सोनिया गांधींवर सोपवण्यात आला आहे.

महाविकासआघाडीत वर्णी लागणाऱ्या संभाव्य मंत्र्यांची नावं

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी :
अजित पवार
जयंत पाटील
दिलीप वळसे पाटील
हसन मुश्रीफ
छगन भुजबळ
नवाब मलिक
राजेश टोपे
अनिल देशमुख
धंनजय मुंडे
जितेंद्र आव्हाड

काँग्रेसच्या मंत्र्यांची संभाव्य यादी :
अशोक चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण
बाळासाहेब थोरात
विजय वडेट्टीवार
सतेज पाटील
वर्षा गायकवाड
यशोमती ठाकूर
के सी पडवी
विश्वजित कदम
सुनील केदार
नाना पटोले / नितीन राऊत

शिवसेनेच्या मंत्र्यांची संभाव्य यादी :
एकनाथ शिंदे
सुभाष देसाई
रामदास कदम
सुनील प्रभू
अनिल परब
उदय सामंत
दीपक केसरकर
तानाजी सावंत
गुलाबराव पाटील
संजय राठोड